होडीतील जीवघेणा प्रवास थांबणार केव्हा ?

होडीतील जीवघेणा प्रवास थांबणार केव्हा ?

दळणवळणाची साधने सर्वदूर पोहोचली. अगदी दुर्गम गावेही बारमाही वाहतुकीने जोडली गेली; मात्र सिंधुदुर्गात अजूनही अशा लोकवस्त्या, वाड्या, गावे आहेत की, जिथे पावसाळ्यातलं जगण अंगावर शहारा आणणार असतं. खाडी, नद्या, समुद्राच्या अडसरामुळे तीन ते चार महिने जीवावर उदार होऊन बाह्यजगाशी संपर्क साधायचा असतो. तसा यांचा बारमाही प्रवास धोका पत्करूनच असतो; पण पावसाळा बाया बापड्यांपासून शाळकरी मुलांपर्यंत कायम धोक्‍याच्या पातळीतच नेणारा असतो. अशा भागांची, गावांची, वस्त्यांची व्यथा मांडणारी ही मालिका...

बांदा - गेली कित्येक वर्षांची मागणी असलेल्या बांदा-आरोसबाग तेरेखोल नदीपात्रावरील पुलाचे काम हे धीम्या गतीने सुरू असल्याने यावर्षीही आरोसबाग वाडीतील ग्रामस्थांना पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून सक्तीचा होडी प्रवास करावा लागत आहे.

शेर्ले गावची वाडी असलेल्या आरोसबागची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. याठिकाणी ८४० कुटुंबे आहेत. या वाडीतून दररोज १५० शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी होडीतून प्रवास करतात. तेरेखोल नदीमुळे या वाडीचा बांदा शहराशी दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. शेर्लेमार्गे बांद्यात येण्यासाठी या वाडीतील लोकांना सुमारे ८ ते १० किलोमीटर पायपीट करावी लागते.

तेरेखोल नदीपात्रातून बांद्यात येण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या नदीपात्रावर पुलाची मागणी गेली ३५ वर्षे आरोसबागवासीयांतून होत होती. पुलाच्या मागणीसाठी कित्येकदा आंदोलने, उपोषणेदेखील केली. युती शासन काळात १९९७ मध्ये या पुलाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले होते; मात्र त्यानंतर शासनस्तरावरून ठोस कार्यवाही न झाल्याने पुलाचे काम रखडले होते.

राज्यात पुन्हा युती शासन आल्याने या पुलाच्या मागणीचा जोर वाढला. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुन्हा पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात आला; मात्र पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने आरोसबागवासीयांना होडीचाच आधार घ्यावा लागत आहे.

आरोसबाग वाडी ही पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. बाजारहाट, वैद्यकीय, शिक्षण सेवेसाठी येथील स्थानिकांना बांद्यातच यावे लागते. या वाडीतील लोकांना बांद्यात येण्यासाठी होडीतून येण्याशिवाय गत्यंतर नसल्याने पावसाळ्यात त्यांच्यासाठी जीवघेणा प्रवास ठरत आहे. भर पावसाळ्यातही नदी दुथडी भरून वाहत असतानादेखील येथील 
 स्थानिक नागरिक होडीतून प्रवास करतात. आरोसबाग ग्रामस्थ दरवर्षी जानेवारीमध्ये श्रमदानाने नदीपात्रावार लाकडी साकव उभारतात. उन्हाळ्यात चार महिने या मार्गावरून प्रवास करण्यात येतो; मात्र आठ महिने नदीपात्रातून जीव मुठीत घेऊनच हा प्रवास करावा लागतो. यात शाळकरी अनेक विद्यार्थी व रुग्णांचाही समावेश असतो. पुलाचे काम फारच धीम्या गतीने 
सुरू आहे.

आरोसबागवासीय कित्येक वर्षांपासून नदीतून प्रवास करत आहेत. पावसाळ्यात नदीपात्रात पाण्याचा प्रवाह हा वेगवान असतो. अशावेळी होडीतून प्रवास करताना मनामध्ये प्रचंड भीती असते; मात्र शिक्षणासाठी बांद्यात यावे लागत असल्याने आम्ही विद्यार्थी मनातील भीती बाजूला ठेवून होडीतून प्रवास करतो. आमच्या मागील कित्येक पिढ्यांपासून पुलाची मागणी होत आहे. यावर्षी पूल झाल्यास पुढील पिढीचा शिक्षणासाठीचा होडी प्रवास निश्‍चितच टळेल.
- शीतल नाईक,
विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com