चार वर्षांनी कुठल्या जिल्ह्यातील शाळांसाठी मिळाला सव्वा चार कोटींची निधी... वाचा

विनोद दळवी
Friday, 4 September 2020

गेल्या चार वर्षात प्रथमच हा निधी मंजूर झाला असून यातील दोन कोटी रुपये आले आहेत.

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : समग्र शिक्षा अभियानअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला चार कोटी 29 लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. गेल्या चार वर्षात प्रथमच हा निधी मंजूर झाला असून यातील दोन कोटी रुपये आले आहेत. हा निधी जिल्ह्यातील 129 शाळांची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजनकडे शाळा दुरुस्तीसाठी पाठविलेल्या यादीची खात्री करून यातून 129 शाळा दुरुस्तीसाठी निवडल्या जातील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी गुरूवारी झालेल्या ऑनलाईन शिक्षण समिती सभेत दिली. 

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभा झूम ऍपद्वारे घेण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शिक्षण समिती सभा आज अशाप्रकारे झाली. यावेळी समिती सभापती सावी लोके, सचिव प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दालनातून सहभाग घेतला होता. सदस्य राजन मुळीक, संपदा देसाई, उन्नती धुरी, सुधीर नकाशे, सुनील म्हापणकर, सरोज परब, डॉ. अनिशा दळवी यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी आपआपल्या ठिकाणातून उपस्थित दर्शविली. 

जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनकडे निधी मागण्यात आला आहे. त्यासाठी यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीतून समग्र शिक्षा अभियानमधून 129 शाळा दुरुस्तीसाठी प्राप्त झालेल्या निधितून दुरुस्ती करण्यासाठी शाळा निवडण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी दिली. यावेळी आंबोली येथील शासकीय जागेतील तीन एकर जागा जिल्हा परिषद क्रीडा संकुलसाठी घेण्याचा ठराव आगामी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

39 वैद्यकीय बिले परत 
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांकडून 76 वैद्यकीय बिले आली होती. यातील 39 बिले कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी परत पाठविण्यात आली आहेत. सातपैकी तीन जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि एक बिल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रलंबित आहे. 36 बिले मंजूर केली आहेत, असे सांगत प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी आमच्या कार्यालयात आलेली बिले 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी प्रलंबित ठेवण्यात येत नाहीत, असे स्पष्ट केले. 

शाळा दुरुस्तीची 15 कामे पूर्ण 
जिल्हा नियोजनअंतर्गत जिल्हा परिषदेच्या 276 शाळा दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. यातील 15 दुरुस्ती पूर्ण झाली आहेत. 35 कामे प्रगतीत आहेत. 21 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. एक काम रद्द करण्यासाठी प्रस्तावित आहे, तर 204 कामे निविदा कार्यवाही प्रक्रियेत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम प्रभारी उपअभियंता लक्ष्मण परुळेकर यांनी दिली. 

शिक्षकमित्र बनण्यासाठी पत्र प्रपंच 
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन दोडामार्ग या संस्थेने लॉकडाउन काळात दोडामार्ग तालुक्‍यासह 56 गावांत मोफत शिक्षण दिले. गणित, इंग्रजी भाषा विषयाचे धडे दिले. त्यामुळे येथील मुले कायम शिक्षण प्रवाहात राहिली. आता ही संस्था आपल्या 150 विद्यार्थ्यांकरवी पूर्ण जिल्ह्यात अशाच प्रकारे मार्गदर्शन करणार आहे. सप्टेंबरमध्ये याची सुरुवात होत आहे. यासाठी आम्ही शिक्षण सभापती व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची संयुक्त स्वाक्षरी असलेले पत्र जिल्ह्यातील सरपंचाना पाठवित आहोत. "शिक्षणमित्र' म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहोत, असे आंबोकर यांनी सांगितले. यावेळी अशाप्रकारे उपक्रम राबविल्या बद्दल उन्नती धुरी यांनी संस्था, सभापती व शिक्षणाधिकारी यांचे अभिनंदन केले. 

आंतरजिल्हा बदलीतून चार शिक्षक मिळाले 
श्री. आंबोकर यांनी आंतरजिल्हा बदलीअंतर्गत जिल्ह्यातून पाच शिक्षकांची बदली झाली आहे; मात्र त्यांना अद्याप जिल्हा परिषदेने सोडलेले नाही, तर याच बदली अंतर्गत चार शिक्षक जिल्ह्याला मिळाले आहेत. यातील तीन शिक्षक हजर झाले आहेत. अद्याप त्यांना शाळा नियुक्ती दिलेली नाही. पुढील आठ दिवसांत ही नियुक्ती दिली जाईल, अशी माहिती दिली. 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which district got Rs 4.5 crore for repair of schools?