संततधार पावसामुळे कुठल्या जिल्ह्यात घरे आणि गोठ्यांचे झाले नुकसान...वाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत.

वैभववाडी :  सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. संततधारेमुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरे, गोठे कोसळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आचरा हिर्लेवाडी येथील घराला पाण्याने वेढले असून, या परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले आहे. मालवणात सलग दोन दिवस सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता. 2) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यानंतर शुक्रवारी (ता. 3) सकाळी पावसाचा जोर किंचीत कमी झाला; परंतु रात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात झाली. आज दिवसभर संततधार सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. आंबेरी नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने कुडाळ तालुक्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. या गावातील जनजीवन विस्कळित झाले आहे. आंबेरी पुलाच्या दुतर्फा अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मुसळधारेमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरे, गोठे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. काही गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. मालवण, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्‍यांना तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या तालुक्‍यातील सर्वच नद्यांना पूर आला. आचरा हिर्लेवाडी येथील एका घराला पाण्याने वेढले आहे. याशिवाय, येथील काही घरांच्या भिंती कोसळून नुकसानही झाले. मसुरे परिसरातील अनेक बागायतींमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मालवण तालुक्‍यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. दोन दिवसांत या तालुक्‍यात 390 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

आंबेरी पूल पाण्याखाली 
माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीवरील ब्रिटिशकालीन आंबेरी पुल पाण्याखाली गेल आहे. पूल गेल्या दहा दिवसांत दोन वेळा पाण्याखाली गेल्यामुळे माणगावपासून शिवापुरपर्यंतच्या जवळपास 25 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर कमी प्रमाणात होत असला तरी मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. 

दुपारनंतर जोर कमी 
वैभववाडी तालुक्‍यातील तिरवडे तर्फे खारेपाटण येथील ग्रामपंचायतीची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्याच गावातील एकाचा गोठा कोसळला. जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In which district house and cowshed collapsed due to incessant rains ... read on