कुठल्या जिल्ह्याच्या गणेशोत्सवावर आहे वादळी पावसाचे सावट... वाचा 

विनोद दळवी
Tuesday, 18 August 2020

हवामान खात्याने पुन्हा इशारा देत पावसाचा जोर "धार' मुक्काम 21 पर्यंत लांबणार असल्याचे कळविले आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर ओसरला; मात्र प्रादेशिक हवामान विभागाने 21 पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा तसेच 21 ला जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीवर पावसाचे सावट राहणार आहे. तिलारी नदीचे पाणी इशारा पातळीजवळ आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
जिल्ह्यात अनेक दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारच्या पावसाने जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पावसाची नोंद 82.15 मिलीमीटर एवढी झाली आहे. त्या तुलनेत सोमवारी पावसाने विश्रांती घेतली होती. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाची पूर्व तयारी जोरात सुरु आहे; पण पावसामुळे त्यात व्यत्यय येत आहे. सोमवारी उघडीप मिळाल्याने भक्तांना दिलासा होता; पण हा दिलासा औट घटकेचा ठरणारा आहे. कारण हवामान खात्याने पुन्हा इशारा देत पावसाचा जोर "धार' मुक्काम 21 पर्यंत लांबणार असल्याचे कळविले आहे. हा इशारा खरा ठरला तर उत्सवाच्या पूर्व तयारीवर सावट राहणार आहे. 

दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी नदीच्या पाण्याची पातळी 41.20 मीटर इतकी झालेली आहे. इशारा पातळी 41.6 मीटर असून धोका पातळी 43.6 मीटर आहे. तिलारी धरणाची पाणी पातळी 110.1 मीटर झाली आहे. पातळी वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे. 

हवामान विभागाने 20 पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. त्यामुळे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे-आवडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. संबंधित गावातील नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये-जा करु नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी सतर्कता बाळगावी. संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींनी सखल भागात राहणाऱ्या तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या व्यक्तींबाबत आवश्‍यक ती दक्षता घ्यावी. पाणी पातळीत वाढ झाल्यास तातडीने संबंधित नागरिकांना स्थलांतरीत करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. 

सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस 
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक 122 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्याची सरासरी 82.150 असून आतापर्यंत एकूण सरासरी 3507.069 मिलीमीटर आहे. दोडामार्गात 91 मिलीमीटर, सावंतवाडीत 122, वेंगुर्लेत 58.20, कुडाळात 67, मालवणात 57, कणकवलीत 117, देवगडात 30 तर वैभववाडीत 115 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. 

असा आहे धोका 
जिल्ह्यात उद्या (ता. 18) मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. ता. 19 व 20 ला मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. ता. 21 ला पुुन्हा मुसळधार ते अती मुसळधारची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ता. 21 पर्यंत दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. तरी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. याबाबत आवश्‍यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने केले आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which district's Ganeshotsav is affected by torrential rains ... read on