त्रिसदस्यीय समितीकडून क्लीन चीट मिळताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठले प्रांत झाले कामावर रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

0

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, असा इशारा देत आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.

त्रिसदस्यीय समितीकडून क्लीन चीट मिळताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठले प्रांत झाले कामावर रुजू

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : त्रिसदस्य समितीकडून क्लीन चीट मिळताच बुधवारी कुडाळच्या प्रांत वंदना करमाळे कामावर हजर झाल्या. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिवसभरात घेतलेल्या काही बैठकांनाही त्यांनी हजेरी लावली.
करमाळे यांच्यावर मुंबई-गोवा महामार्ग चौपदारीकरणमध्ये बाधित नागरिकांना मोबदला देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी त्रिसदस्य समिती नियुक्त केली होती. समितीने चौकशी अहवाल मंजूलक्ष्मी यांना सादर केला असून त्यात वंदना खरमाळे यांना निर्दोष ठरवित त्यांना हजर करून घ्यावे, असा अभिप्राय दिला आहे. 

कुडाळ प्रांत कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांत पैसे मागीत असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला होता. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, असा इशारा देत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 30 जूनला कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी चौकशीची लेखी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती. 

तालुका प्रमुख नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात या प्रकारणाची ऑडियो क्‍लिप आहे. ज्या बॅंकेत हे पैसे जमा होणार होते, तेथील कर्मचाऱ्याने नुकसान रक्कम न मिळण्यात बॅंकेचा दोष नाही, प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पैसे मागत आहेत, असे सांगितले होते, असे नमूद केले होते. याची गंभीर दखल घेत मंजूलक्ष्मी यांनी दोन जुलैला चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यापूर्वी खरमाळे यांना दोन ते 30 जुलैपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भू संपादन अधिकारी वर्षा सिंगन, जिल्हाधिकारी कार्यालय लेखाधिकारी नितिन सावंत यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने खरमाळे यांना निर्दोष करत त्यांना कामावर हजर करून घेण्याची शिफारस केली आहे. 

अहवाल सादर 
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ""चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. अहवालात मुंबई-गोवा महामार्ग मोबदला वाटपात दोष नसल्याचे चौकशी समितीचे म्हणणे आहे. तसे चौकशी अहवालात नमूद आहे, असे सांगितले. 

संपादन ः विजय वेदपाठक


 

loading image
go to top