सरसकट टाळेबंदी हा काही कोरोनावरचा उपया नव्हे, कोकणातील कुठल्या व्यापारी महासंघाची आहे भूमिका

विनोद दळवी
Wednesday, 16 September 2020

सरसकट टाळेबंदीमुळे आधीच तोळामासा झालेली जिल्ह्याची आर्थिक प्रकृती मात्र गंभीर रूप धारण करील. 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता "जनता कर्फ्यू' जारी करावा, असा एक मतप्रवाह तयार झाला आहे. कुडाळमध्ये यावर अंमलही सुरू झाला; मात्र जिल्ह्याच्या व्यापारी महासंघाने आज आपली भूमिका स्पष्ट करत, सरसकट टाळेबंदीला विरोध नोंदवला आहे. 

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लगतच्या काही जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही तसे पाऊल उचलावे, असा एक मतप्रवाह आहे; पण याला विरोध करणारा मतप्रवाहही तितकाच मजबूत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा कर्फ्यू किंवा लॉकडाउनबाबत व्यापारी महासंघाने लॉकडाउन हा कोरोनाचा प्रसार रोखण्याचा एकमेव उपाय नाही, असे स्पष्ट केले आहे. शासकीय नियमांचे पालन करण्याबरोबर प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे सरसकट महासंघ लॉकडाउन एकमुखाने नाकारत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ज्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवायची असतील त्याच्याबद्दल त्यांच्या वैयक्तिक भूमिकेचा किंवा स्थानिक संघटनांच्या निर्णयांचा महासंघ आदरच करील, असेही महासंघाने म्हटले आहे. 

महासंघाने निवेदनात म्हटले आहे, की मार्चपासून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह सर्वच नागरिकांनी फार मोठ्या धैर्याने कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले आहे. चार-सहा महिन्यांचे कडक लॉकडाउन अनुभवल्यानंतर गणेश चतुर्थीपासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे; मात्र याच काळात आता कोरोना प्रादुर्भावित लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या संख्येमागे शासनाने लागू केलेले "पुन:श्‍च हरी ॐ' अर्थात "ओपन अप'चे धोरण कारणीभूत नसून कोरोना संक्रमणाबाबत आवश्‍यक ती किमान खबरदारी न बाळगण्याची लोकांची बेफिकिर मानसिकता, कोरोनाबाबत सामाजिक प्रसारमाध्यमातून पसरविण्यात येणारे धादांत खोटे मजकूर, व्हिडिओ व त्यातूनच जनमानसात निर्माण झालेली अवास्तव भीती कारणीभूत आहे. 

तालुका पातळीवर सुविधा उपलब्ध झाल्याने दैनंदिन तपासण्याची संख्या वाढली आहे. साहजिकच बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यापैकी 99 टक्के बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. याचाच अर्थ चार-सहा महिन्यांच्या लॉकडाउनमधून काहीही साध्य झाले नसून जगभराच्या सांख्यिकी प्रमाणातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे. 

महासंघाचे संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी व्यापारी संघाच्या तालुकाध्यक्षांशी चर्चा केली. बहुतांश महासंघाच्या भूमिकेशी सहमत आहेत. सरसकट लॉकडाउनने फायदा होणार नाही; उलट अर्थचक्र बंद पडून त्याचा फार मोठा फटका सामान्यांनाच बसणार आहे. त्यामुळेच महासंघाच्या भूमिकेशी ठाम राहण्याचे ठरले. संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण लॉकडाऊन पुन्हा लागू करणे हिताचे नाही. लॉकडाउनने कोरोनाचा प्रसार थांबू शकत नाही, हे वैभववाडी आणि दोडामार्गमध्ये स्पष्ट झाले आहे. सरसकट टाळेबंदीमुळे आधीच तोळामासा झालेली जिल्ह्याची आर्थिक प्रकृती मात्र गंभीर रूप धारण करील आणि त्याचा फटका या व्यवसायांवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना बसणार आहे. 

कुडाळ, ओरोससह पणदूरमध्ये उत्स्फूर्त बंद 
कुडाळ येथील महासंघाच्या बैठकीत शहरात पुन्हा एकदा एका आठवड्याची संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली. त्या पाठोपाठ ओरोस आणि पणदूर येथील व्यापारी संघानी स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी घोषित केली. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने भूमिका स्पष्ट केल्याचे म्हटले आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which trade federation in Konkan thinks that The total lockout is not a solution