esakal | विसर्जनाच्या मुद्द्यावरून नगरपंचायती विरोधात का आहेत दापोलीकर संतापलेले... वाचा काय आहे.
sakal

बोलून बातमी शोधा

०

नगरपंचायतीने दापोलीकरांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, असा आक्षेप नोंदवत दापोलीकरांनी जाब विचारला.

विसर्जनाच्या मुद्द्यावरून नगरपंचायती विरोधात का आहेत दापोलीकर संतापलेले... वाचा काय आहे.

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक तलाव असताना दापोली नगरपंचायतीने दीड दिवसांच्या गणेशमूर्ती भाविकांकडून ताब्यात घेऊन त्या कृत्रिम तलावात विसर्जित केल्यासारखे दाखवले. प्रत्यक्षात या मूर्ती दाभोळ खाडीत विसर्जन केल्या. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या म्हणून दापोलीकरांनी नगरपंचायत कार्यालयात प्रशासनाला सोमवारी जाब विचारला आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

दापोली शहरातील आसऱ्याचा पूल येथे गणेश विसर्जन घाटाचे सुमारे 80 लाख रुपये खर्च करून नूतनीकरण व सुशोभीकरण केले. या वर्षी या तलावात पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे आसऱ्याच्या पुलाजवळ तसेच काळकाई कोंड व स्टेट बॅंकेसमोर प्लॅस्टिक टाक्या ठेवल्या. त्यात दापोलीकरांनी विसर्जनासाठी आणलेल्या दीड दिवसांच्या मूर्ती तीनवेळा बुडवून ट्रकमध्ये ठेवल्या. सायंकाळी या मूर्ती दाभोळ खाडीत विसर्जित केल्या. 

गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी इतर जागा असताना व तेथे पुरेसे पाणी असताना नगरपंचायतीने हा उपद्‌व्याप करून दापोलीकरांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप दापोलीकरांनी केला. त्याचा जाब विचारण्यासाठी दापोलीकरांनी दुपारी नगरपंचायत कार्यालयात धाव घेतली. मुख्याधिकारी रोडगे कार्यालयात आलेले नसल्याने प्रशासकीय अधिकारी प्रवीण खरात यांची भेट घेतली. पाच दिवसांच्या व अनंत चतुर्दशीच्या दिवशी नगरपंचायतीने विसर्जन ठिकाणात बदल केला नाही तर विसर्जनासाठी आणलेल्या गणेशमूर्ती रस्त्यावर ठेवून आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला. 

या वेळी श्री मानाचा गणपती मंडळाचे अध्यक्ष संजय घाटगे, भाजपचे शहराध्यक्ष संदीप केळकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय शिंदे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, माजी नगरसेवक नितीन शिंदे, मनविसे तालुकाध्यक्ष साईराज देसाई, कुणाल शिंदे, सचिन सावंत, अमिर गोलंदाज, सिद्धेश शिंदे, मनोज शिंदे आदींसह भाजपाचे तसेच मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

गेल्या वर्षीची पुनरावृत्ती 
गेल्या वर्षी या तलावात पुरेसे पाणी नसल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी या तलावात दिसू लागल्या. नगरपंचायत प्रशासनाने विसर्जन तलावात पाण्याची पातळी योग्य रीतीने न ठेवल्याने विसर्जित गणेशमूर्ती दिसू लागल्या. परिणामी धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने चिडलेले दापोलीकर पोलिस ठाण्यात नगरपंचायत प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पोलिस निरीक्षक व नगरपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेऊन सर्व गणेशमूर्ती या तलावाबाहेर काढून त्यांचे दाभोळ खाडीत विसर्जन केले. या तलावाचे काम अजूनही सुरू असून पुढील वर्षी ही तक्रार राहणार नाही, अशी ग्वाही दिली होती. 

संपादन ः विजय वेदपाठक

loading image