esakal | कोणतेही लक्षणे नसलेले 85 टक्के कोरोना रुग्णच संसर्ग वाढीसाठी का ठरतात घातक 
sakal

बोलून बातमी शोधा

०

चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्यावर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

कोणतेही लक्षणे नसलेले 85 टक्के कोरोना रुग्णच संसर्ग वाढीसाठी का ठरतात घातक 

sakal_logo
By
विनोद दळवी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित आले, खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळेच कोरोना संसर्ग वाढला आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर हे नियम नागरिक अजूनही धाब्यावर बसवत आहेत. कोणतीही लक्षणे नसलेले 80 ते 85 टक्के रुग्णच जास्त घातक ठरत आहेत. ते बिनधास्त वावरत असल्याने  जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट वाढत आहे, असा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी "सकाळ' शी बोलताना केला. 

चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्यावर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दिवसाला 150 ते 175 रुग्ण सापडू लागले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत डॉ. फुले म्हणाल्या, की चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्यावर कोरोना वाढला. कारण, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित आले. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली. अँटिजेन टेस्टमुळे हे वेळेत लक्षात येत आहे. परंतु स्क्रिनिंग, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढल्याचे उघड होत आहे. अँटिजेन टेस्टमुळे 15 मिनिटांत निदान होते, ही एक चांगली बाब आहे. परंतु, अजूनही लोक लक्षणे लपवत आहेत. वेळेवर सांगत नसल्याने संसर्ग वाढतो. सप्टेंबर महिना तर कोरोनावाढीचा कालावधी आहे. त्यामुळे सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे. 

...असे येईल नियंत्रण! 
कोरोनावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. आरोग्य यंत्रणा, पोलिस, प्रशासन सर्व चांगले काम करीत आहेत. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन नागरिकांनी केले पाहिजे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे. एकत्र गोळा होणे टाळले पाहिजे. आपला जीव महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवून विनाकारण घराबाहेर पडू नये, घरात राहावे व सुरक्षित राहावे. 

डिक्रिझिंग ट्रेंडची आता गरज 
कोरोना वाढीचा हा महिना आहे. पुढच्या महिन्यात नियंत्रणात येईल की नाही, हे सांगू शकत नाही. नवीन रुग्ण जास्त मिळत असून, डिस्चार्ज होण्याचे प्रमाण कमी होत आहे. डिस्चार्ज जास्त आणि नवीन रुग्ण कमी होतील, तेव्हा डिक्रिझिंग ट्रेंड म्हणता येईल. 

संपादन ः विजय वेदपाठक
 

loading image
go to top