सखोल तपासासाठी त्या' महिलेचे रेखाचित्र तयार करणार  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

आंबोली घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला. या महिलेचा चेहरा पूर्णपणे कुजल्याने ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - आंबोली घाटात टाकण्यात आलेला अनोळखी महिलेच्या मृत्यूबाबत अद्यापही कोणतीही ठोस माहिती मिळत नसून सध्या कर्नाटक, गोवा व राज्यातील जिल्ह्यातील कोणती महिला बेपत्ता आहे का? याचा या गोष्टीला प्राथमिकता देण्यात येत आहे. चेहरा पूर्णतः कुजल्याने त्या महिलेचे रेखाचित्र तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली. बुधवारी (ता. 9) त्यांनी तपास हाती घेतला आहे. 

आंबोली घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला. या महिलेचा चेहरा पूर्णपणे कुजल्याने ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव यांच्याकडून पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांच्याजवळ सोपविण्यात आला आहे.

गोते यांनी तातडीने तपसास गती देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत त्याना विचारले असता ते म्हणाले, ""सद्यस्थितीत या महिलेच्या अंगावर कपडे व पायात पैंजण व्यक्तिरिक्त काहीही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तपासात अनेक अडचणी उद्‌भवत आहेत; मात्र राज्यातील तसेच गोवा व कर्नाटकमधील काही पोलीस ठाण्याशी संपर्क करून बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती घेण्याचे कामयुद्धपातळीवर सुरू आहे. या महिलेचा घातपात करून मगच तिला आंबोली घाटात आणून टाकण्यात आल्याचा संशयही नाकारता येत नाही. ओळख पटविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून तिचे रेखाचित्रही रेखाटण्यात येणार आहे.''  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Draw Drawing Of Woman For Deep Investigation