esakal | हायवे ठेकेदारासह देखरेख कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव देणार... कणकवलीवासियांना कुणी केले आश्वस्त... वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

high way

उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर तहसील कार्यालयात कणकवलीतील लोकप्रतिनिधी आणि महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक झाली.

हायवे ठेकेदारासह देखरेख कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव देणार... कणकवलीवासियांना कुणी केले आश्वस्त... वाचा

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (जि. सिंधुदुर्ग)  : निकृष्ट आणि निष्काळजीपणे काम करणारी ठेकेदार आणि देखरेख करणारी अशा दोन्ही कंपन्यांवर गुन्हा दाखल करावी, अशी आक्रमक भूमिका कणकवलीकरांनी शनिवारी घेतली. महामार्गाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी या दोन्ही कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाला पाठविणार असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी महामार्ग अभियंत्यांना धारेवर धरत प्रश्‍नांचा एकच भडीमार केला. 

शहरातील उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर येथील तहसील कार्यालयात कणकवलीतील लोकप्रतिनिधी आणि महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, महामार्गाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्यासह माजी आमदार परशुराम उपरकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, आम्ही कणकवलीकर संस्थेचे अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री, संजय मालंडकर, उपअभियंता विजय पवार, देखरेख कंपनीचे एम. आर. सिंग, ठेकेदार कंपनीचे श्री. परिहार उपस्थित होते. 

जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात उड्डाणपुलाची भिंत कोसळली. त्यानंतर उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला. या घटना म्हणजे कणकवलीकरांच्या जीविताशी खेळ आहे. कंपनी आज आपले काम पूर्ण करेल आणि निघून जाईल; पण हायवेचे बांधकाम असेच कोसळत राहिले तर अनेक प्रवासी, पादचारी नाहक जिवाला मुकतील. त्यामुळे निष्काळजीपणे काम करणारी हायवे ठेकेदार आणि या कामावर देखरेख ठेवणारी कंपनी या दोहोंवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका शहरातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी घेतली होती. 

ठेकेदार पळून कसा जाईल?

हायवे ठेकेदारावर गुन्हा दाखल केला तर तो पळून जाईल, अशी भूमिका हायवे कार्यकारी अभियंता शेख यांनी मांडली. पंधरा वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेतलेली कंपनी पळून कशी जाईल, असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला. अखेर शेख यांनी या दोन्ही कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाला पाठवीत असल्याची ग्वाही दिली. 

काम सुरू असताना अभियंते अनुपस्थित 
उड्डाणपुलाचे स्लॅब घालत असताना हायवे प्राधिकरण, ठेकेदार कंपनी यापैकी कुणाचाही अभियंता उपस्थित नसल्याची बाब या बैठकीत उघड झाली. उड्डाणपुलाची भिंत कोसळल्यानंतर चौपदरीकरणाचे काम थांबविण्याचे आदेश प्रांतांनी दिले होते. या आदेशाचा ठेकेदाराने भंग केल्याचेही बाळू मेस्त्री यांनी निदर्शनास आणून दिले. 

कंटेनरची धडक बसल्यानंतरही काम सुरू का ठेवले?
पुलाचे स्लॅब सुरू असताना, बॅरिकेटला कंटेनरची धडक बसली. यात पुलाचे सपोर्ट हलले आणि स्लॅब कोसळल्याची माहिती या सभेत देखरेख कंपनीचे श्री. सिंग यांनी दिली. बॅरिकेटला धडक बसल्याची बाब माहीत असतानाही पुलाचे स्लॅब का घालू दिले, असा सवाल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. 

संपादन ः विजय वेदपाठक

loading image