कोकणवासियांना दिलेली आश्वासने शिवसेना पाळणार का ?

Will Shiv Sena Fulfill Promises Given To Konkan people
Will Shiv Sena Fulfill Promises Given To Konkan people

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी, मच्छीमार यांच्यासह कोकणवासीयांना अनेक आश्‍वासने दिली. आता मुख्यमंत्री पदामुळे शिवसेना याची पुर्तता करेल अशी आशा कोकणातून व्यक्‍त होत आहे.

23 ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचा निकाल लागल्यानंतर महीना उलटून गेला तरी नवीन सरकार स्थापन झाले नव्हते. भाजप-सेनेची नैसर्गिक युती निवडणूक निकालानंतर तुटली. शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस सरकार स्थापन करते असे वाटत असताना भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे यापूर्वी घडला नाही एवढा मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे दिले. परिणामी हे सरकार कोसळले. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस हे नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचे नेते उद्धव ठाकरे असतील हे सुद्धा निश्‍चित झाले आहे. त्यामुळे गेले महिनाभर नुकसानीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकार मायबाप सढळ हस्ते पुरेशी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जाहीर मदत तटपुंजी

कोकणात क्‍यार वादळामुळे पडलेल्या पावसाने हजारो हेक्‍टर क्षेत्रफळ हंगामी शेती शासनाच्या 33 टक्के निकषापेक्षा जास्त बाधित झाली आहे. सिंधुदुर्ग या एकट्या जिल्ह्यात 30 हजार 15 हेक्‍टर 64 गुंठे भात शेती बाधित झाली आहे. 68 हजार शेतकरी बाधित झाले आहेत. 124 कोटी 78 लाख 68 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचाच अर्थ हेक्‍टरी 41 हजार 574 रुपयांचे हे नुकसान आहे. मात्र, सरकार अस्तित्वात नसल्याने राष्ट्रपती राजवटित राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी हेक्‍टरी 8 हजार रूपये मदत जाहिर केली होती. मात्र, प्रत्येक्षात जिल्ह्यात 6 कोटी 65 लाख 9 हजार रूपये प्राप्त झाले. राज्यपाल यांनी जाहिर केलेल्या हेक्‍टरी 8 हजार रूपये यानुसार हा आकडा 24 कोटी 1 लाख 20 हजार एवढी ही रक्कम होते. त्यामुळे शेतकरी लोकनियुक्त सरकार कधी स्थापन होते? याची वाट पाहत होते.

शिवसेना सत्तेत येऊन कोणती घेणार भूमिका

नव्याने स्थापन होवू घातलेल्या महाविकास आघाडी या सरकारचे कॅप्टन ठरले आहेत. त्यांचा शपथ विधी 28 रोजी होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर हे सरकार खऱ्या अर्थाने कारभार सुरु करील; मात्र या सरकारचे नेते शिवसेना पक्ष प्रमुख आहेत. त्यामुळे शेतकरी राज्याच्या आशा वाढल्या आहेत. कारण पाच वर्षापूर्वीच कॉंग्रेस-राष्ट्रवादी वरचा विश्वास शेतकऱ्यांचा उडाला आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकार न्याय देवू शकले नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेना शिल्लक राहिली आहे. शिवसेना नेहमी शेतकऱ्यांना मदत करा. त्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी करीत होती. सत्तेबाहेर राहून मागणी करणाऱ्या व शेतकऱ्यांना कायमच दिलासा देण्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आता सत्तेत राहून ही भूमिका निभावण्याची वेळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातपिक शेतीसाठी घेतलेले 80 कोटींचे कर्ज माफ करावे, अशीही मागणी शिवसेनेने केली होती. तसेच फडणवीस सरकारने खावटी कर्जमाफी जाहिर केली होती. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही कर्जमाफी आहे. त्याचा आदेश झालाय. परंतु निधी मिळालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता त्याची वाट पाहत आहे. यासाठीही शिवसेनेचा नेहमी हट्टाहास्‌ होता. आता तीच शिवसेना सत्तेतील प्रमुख घटक आहे. याचाही फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती होतो? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. 

नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत मच्छीमार

क्‍यार वादळामुळे पडलेल्या पावसाने जसे शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच नुकसान पाऊस व वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील मश्‍चिमारांचे झाले आहे. ही नुकसानी कित्येक कोटिंनी आहे. ही नुकसानी मिळावी, या प्रतीक्षेत मच्छिमार आहेत. या शिवाय ऑगस्ट ते ऑक्‍टोबर महिन्यात मच्छीमारी हंगामा असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे मच्छीमारांना मासेमारी करता आलेली नाही. त्यांचा उदरनिर्वाह हिरावला गेला आहे. त्यामुळे या मच्छीमारांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशीही मागणी शिवसेनेने लावून धरली होती. ती मागणी स्वतःच पूर्ण करण्याची संधी शिवसेनेला आली आहे.

एकमेव आमदार विरोधी पक्षाचा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण आठ आमदार आहेत. त्यातील सहा आमदार शिवसेनेचे आहेत. एक भाजप व एक राष्ट्रवादी पक्षाचा आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी असल्याने आठ पैकी सात आमदार सत्ताधारी होणार आहेत. एकच आमदार विरोधी पक्षाचा होणार आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी यांची जबाबदारी वाढणार आहे. विशेषता शिवसेनेची जबाबदारी वाढणार आहे. कारण मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा असून सहा आमदार त्यांच्याच पक्षाचे आहे. या मागण्या मान्य न झाल्यास सर्वाधिक रोष शिवसेनेवर येणार आहे.

कोकणसाठी मिळालेली भरपाई तुटपुंजी

राज्यातील शेती नुकसानीसाठी राज्यापालांनी 2 हजार 36 कोटी 65 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील कोकण विभागासाठी 34 कोटी 74 लाख रूपये वाटणीला आले आहेत. यातील सिंधुदुर्ग 6 कोटी 65 लाख 9 हजार, रत्नागिरी 5 कोटी 1 लाख रूपये, पालघर 9 कोटी 73 लाख 8 हजार रूपये, ठाणे 8 कोटी 20 लाख 68 हजार रूपये, रायगड 5 कोटी 17 लाख 14 हजार रूपये अशाप्रकारे जिल्हानिहाय निधी देण्यात आला आहे. ही मदत अल्प असून त्यात भरघोस वाढ झाली पाहिजे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com