Ratnagiri : सर्व निवडणुका स्वबळावर जिंकणार : उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सर्व निवडणुका स्वबळावर जिंकणार : उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही प्रत्येक पक्षाला पक्षवाढीचे कोणतेही बंधन नाही. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्याच्या विकासासाठी सदैव बांधील असून आगामी सर्वच निवडणूका शिवसेना स्वबळावर जिंकेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंडणगड येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.तब्बल दोन वर्षानंतर आयोजित मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

उदय सामंत म्हणाले, ‘शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर ती एक विचारधारा आहे. तळागाळातील वंचित जनतेला विकासाच्या रुपाने न्याय देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मंडणगड तालुका हा मूलभूत विकासापासून वंचित राहिला आहे. मंडणगड तालुका व संपूर्ण दापोली विधानसभा मतदारसंघ विकासात्मक बाबतीत आदर्शवत ठरेल. त्यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटंबातील मुलांमुलींना रोजगारक्षम मॉडेल कॉलेज व स्पर्धा परीक्षांची केंद्र आमदार योगेश कदम ज्या ठिकाणी जागा दाखवतील, तिथे सुरू केली जातील.

शाखाप्रमुखांपासून ते जिल्हाप्रमुखांपर्यंत शिवेसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना पक्ष करीत असलेले विकासाचे काम घराघरात जनतेपर्यंत कसे पोहचवावे याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन जानेवारी महिन्यात मेळाव्यांच्या माध्यमातून सुरू करण्याचा मानस आहे. याप्रसंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, कृषी सभापती रेश्मा झगडे उपस्थित होते.

आमदार कदमांचा स्वकियांवर हल्लाबोल

आमदार योगेश कदम यांनी आक्रमकपणे पक्षातील आत्मसंतुष्ठ स्वकियांवर हल्लाबोल केला. शिवसेनेला दापोली मतदारसंघात विरोधकच उरलेला नाही. मात्र पक्षातील काही स्वकियांकडून नाहक त्रास देण्याचे काम तसेच पक्षाला बदनाम करण्याचे काम सुरू असून त्याचा योग्य वेळी योग्य समाचार शिवसैनिक घेतील. राजकारण म्हणजे केवळ पैसा कमवण्याचा धंदा नव्हे हे विरोधकांना लक्षात घ्यावा, असा उपरोधिक टोला लगाविला.

अनंत गीतेंच्या गैरहजेरीबाबत जोरदार चर्चा

माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना उपनेते अनंत गीते यांच्या अनुपस्थितीबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मेळाव्यात सारवासारव करण्यात आली. मात्र याची जोरदार चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती. तसेच शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांची मेळाव्यास लाभलेली अनुपस्थिती शिवसैनिकांत चर्चेचा विषय ठरली.

loading image
go to top