
आंब्याच्या कलमांना आला मोहोर
कोकणात थंडीने हुडहुडी; दापोलीचा पारा गेला ११.०९ अंशावर
रत्नागिरी : मतलई वाऱ्यांमुळे कोकणावर थंडीची दुलई पसरू लागली आहे. गावागावांत गारवा जाणवू लागला आहे. दापोलीत पारा ११.०९ अंश सेल्सिअस तर रत्नागिरीत १७ अंशापर्यंत घसरला आहे. संपूर्ण हंगामाच्या सुरवातीलाच दापोलीत पारा खाली आल्याने थंडीचा कडाका दिवाळीत वाढण्याची शक्यता आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ९० टक्के आंबा कलमांना पालवी फुटली. जून असलेली ७ टक्के कलमे मोहोरलेली आहेत.
मोसमी पाऊस यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत होता. त्यामुळे थंडीही लांबली. आठ दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मतलई वारे वाहू लागले. त्यानंतर हवेत गारवा जाणवू लागला; मात्र कडाक्याच्या थंडीची रत्नागिरीकरांना प्रतीक्षाच होती. मंगळवारी (ता. १०) रात्री हलकी थंडी पडली होती. बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील किमान तापमान ११.०९ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात पारा खाली घसरल्यामुळे यंदा चांगली थंडी पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान तज्ज्ञांनीही यंदा कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज वर्तविलेला होता. त्या अनुषंगाने वातावरणात बदल सुरू झाले आहेत. दापोलीतील कमाल तपमान ३२ अंश सेल्सिअस आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीतच हवेत उष्मा असतो. उर्वरित वेळेत जोराचा वारा आणि गारवा जाणवत आहे. संगमेश्वर, चिपळूण, दापोली, खेड, मंडणगडसह अन्य तालुक्यातील नदीकिनारी भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
रत्नागिरीत पारा १७ अंशापर्यंत खाली आला असून कमाल तापमान ३३ अंशापर्यंत आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा आंबा कलमे उशिराने येण्याची शक्यता आहे. पावसामुळे ९० टक्के पालवी आली असून ५ ते ७ टक्केच कलमे जून आहेत. झाडांची संख्या मुबलक आहे तिथे फूट नाही. पालवी आली तर आता लगेच फुटणार नाही. पालवी नसलेल्या झाडांना दीड महिना वाट पाहावी लागेल. आताच्या परिस्थितीवरून आंबा हंगामाचे चित्र स्पष्ट होणार नाही.
कातळावर आंबा कलमांना फूट नाही. पालवी आली तरीही ती आता लगेच फुटणार नाही. थंडी लांबली तर हंगाम लांबण्याची शक्यता आहे; मात्र सध्या हंगामाचं चित्र स्पष्ट झालेले नाही. अतिथंडीचाही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
- प्रसन्न पेठे, बागायतदार
संपादन - अर्चना बनगे
Web Title: Winter Season Dapoli Drops 1109 Degrees Celsius Ratnagiri Drops 17 Degrees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..