
वेहळे येथे 19 वर्षापूर्वी प्रगती व भाग्यश्री या गटांची स्थापना झाली. पहिल्या वर्षी जेव्हा शेती करण्याचा विचार गटाच्या महिलांनी मांडला, तेव्हा त्यांच्याकडे शेतीसाठी कोणतेच भांडवल नव्हते.
चिपळूण ( रत्नागिरी ) - वेहळे येथील भाग्यश्री व राजश्री बचत गटाच्या महिलांनी तब्बल 15 एकर शेती लागवडीखाली आणत कडधान्ये, भाजीपाल्यासोबत कलिंगड उत्पादनाद्वारे लागवड ते विक्रीपर्यंत सर्व कामे स्वतः करीत मोठी आर्थिक प्रगती घडवून आणली.
वेहळे येथे 19 वर्षापूर्वी प्रगती व भाग्यश्री या गटांची स्थापना झाली. पहिल्या वर्षी जेव्हा शेती करण्याचा विचार गटाच्या महिलांनी मांडला, तेव्हा त्यांच्याकडे शेतीसाठी कोणतेच भांडवल नव्हते. तेव्हा दिशांतर या संस्थेने त्यांना साहित्य, बियाणे व खतासाठी मदत दिली. पहिल्या वर्षी 15 एकर शेती भाड्याने घेऊन त्यामध्ये लागवड केली. मटकी, चवळी, हरभरा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगे, मिरची, पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली. या सोबत कलिंगडाची देखील लागवड केली.
उत्पादित झालेला माल स्वतः चिपळूण शहरात भाजीपाला आणून विक्री केल्याने त्यामध्ये आर्थिक फायदा होऊ लागला. पिकासोबत कलिंगडाची लागवड सुरू केली. हे कलिंगड व्यापारी 10 रुपये किलोने मागत होते. तेव्हा या महिलांनी स्वतःच 20 रुपये किलो दराने विक्री केली. या वर्षी 15 एकरात लागवड केली. कलिंगडाची एकूण 5 हजार रोपे लावली आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला कलिंगडे येत असल्याने त्याला चांगला भाव मिळतो. चवीने गोड असलेल्या वाणाची निवड केली. उत्पादनाचे काम व स्वतः ची विक्री व्यवस्था यामुळे हा गट व्यवसायात यशस्वी झाला व या दोन्ही गटाच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने या वर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
गटाच्या माध्यमातून शेतकाम
ज्या महिलांना पूर्वी काम मिळत नसे किंवा इतराकडे काम करावे लागायचे. त्यांना आता गटाच्या माध्यमातून शेतात काम मिळाले आहे.
- शुभांगी राजवीर, प्रगती बचत गट, वेहेळे
डीबीजे महाविद्यालय व मंदार सोसायटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बंधारा बांधून दिला. त्यामुळे भरपूर पाणीसाठा झाला. दरवर्षी बंधाऱ्याची देखभाल करून तो मजबूत ठेवला जातो.