esakal | एकीकडे कोरोनाची धास्ती, दुसरीकडे जीवाची घालमेल
sakal

बोलून बातमी शोधा

Workers worried in sindhudurg district

काहींनी परतण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना जिल्ह्याची सीमा ओलांडता आलेली नाही. 

एकीकडे कोरोनाची धास्ती, दुसरीकडे जीवाची घालमेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिधुदुर्ग) - चिरेखाणीपासून वाळूच्या खाणीपर्यंत आणि रस्ते खडीकरण, डांबरीकरणापासून ते बांधकामाची विविध कामे करणारे कर्नाटकमधील दहा हजारहून अधिक कामगार संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकले आहेत. ते करीत असलेले कामच सध्या बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कुटुंबीयाकडून सतत फोन येत असल्यामुळे या कामगारांच्या जीवाची घालमेल देखील वाढली आहे. काहींनी परतण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना जिल्ह्याची सीमा ओलांडता आलेली नाही. 

जिल्ह्यातील शेकडो चिरेखाणी, वाळूच्या खाणी, रस्ते खडीकरण-डांबरीकरण करणे, क्रशर, सेट्रिंग, स्लॅब घालणे, विहिरी खोदणे, बांधकाम करणे ही कामे कर्नाटकमधील विजापूर, हुबळी, बेळगाव या भागातील मजूर करतात. जिल्ह्यात मजुरांची वाणवा असल्यामुळे ठेकेदार किंवा बांधकाम व्यवसायात काम करणारे शेकडो व्यावसायिक या मजुरांना आगाऊ रक्कम देऊन कामासाठी जिल्ह्यात आणतात. जिल्ह्यातील बहुतांशी चिरेखाणीवर या भागातील मजूर आहेत. याशिवाय वाळूच्या खाणीवर देखील अधिकतर याच भागातील कामगार पाहायला मिळतात. जिल्ह्यात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक मजूर कर्नाटकमधील आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे हे कामगार काम करीत असलेल्या चिरेखाणी, वाळूच्या खाणी बंद झाल्या आहेत. बांधकामांच्या कामांना देखील पूर्णविराम मिळाला आहे. रस्ते खडीकरण, डांबरीकरणाची कामे देखील बंदच आहेत. सर्व कामे बंद झाल्यामुळे कामगारांमध्ये बेचैनी पसरली आहे. कर्नाटकमधील कामगार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात येतात. डिसेंबर ते मे या कालावधीत त्यांच्या हाताला सतत काम लागते. सहा महिने गावाकडची शेती आणि सहा महिने मजुरी करण्यावरच त्यांचा भर असतो. त्यामुळे सहा महिन्यात अधिकाधिक पैसे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो; परंतु आता सर्व कामच बंद असल्यामुळे हे मजूर हवालदिल झाले आहेत. काम नसल्यामुळे बसून किती दिवस खायचे? म्हणून काही मजुरांनी गावी जाण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना माघारी परतावे लागले. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याची माहिती विविध वाहिन्यांवरून कर्नाटकमधील या कामगारांच्या कुटुंबीयांना मिळत आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. कुटुंबीयांकडून सतत फोन करून गावी येण्यासाठी तगादा लावला जात आहे. 

येथे काम नाही आणि गावाकडे जाता येत नाही, त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नेमके काय करावे? ते या मजुरांना सूचत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. अनेक खाणीवरील कामगार टेम्पो किवा अन्य वाहनाने जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन पोलिसांना आणाभाका घेऊन सोडण्यासाठी आग्रह करीत आहेत; परंतु जिल्हा आणि राज्यबंदीचा निर्णय असल्यामुळे पोलिस कुणालाही जिल्ह्याबाहेर सोडत नाहीत. त्यामुळे कधी आंबोली तर कधी फोंडा, करूळ घाटातील तपासणी नाक्‍यावरून जाता येते का? याची सतत हे कामगार चाचपणी करीत आहेत. 

अनामिक भीती 
सध्या 21 दिवसांची संचारबंदी असली तरी त्यामध्ये वाढ होईल, अशी अनामिक भीती या मजुरांमध्ये आहे. संचारबंदी वाढली तर येथे बसून करायचे काय? आणि खायचे काय? हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. दीड-दोन महिन्यात मिळविलेले पैसे येथेच खर्च केले तर गावी काय न्यायचे? शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडे जायचं आहे. तेथे जाण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी त्यांची मागणी आहे. 

जिल्ह्यातील बेघर तसेच परराज्यातील मजुर यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर ही व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब लोकांना वैद्यकीय सेवा घरपोच देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून ही सेवा ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी किंवा स्वयंसेवकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग 
 

loading image