आयटीतील तरुणाची लांजा येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी तरुणाच्या हस्ताक्षरात पोलिसांना बिछान्यावर आढळून आली.

लांजा (रत्नागिरी) : पुणे येथे आयटी कंपनीत काम करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाने लांजा येथील राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मनोज तुकाराम पाटील असे त्यांचे नाव आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी तरुणाच्या हस्ताक्षरात पोलिसांना बिछान्यावर आढळून आली.

हेही वाचा - ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ 

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज तुकाराम पाटील (वय ३२, मूळ गाव माधवनगर, शनिवार पेठ, सांगली) हे पुणे येथील एका आयटी कंपनीत कामाला होते; तर पत्नी सुशिमा म्हाळसाकांत थोरात (३१) या कुरचुंब (ता. लांजा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या दांपत्याला चार वर्षांचा मुलगा आहे. कोरोनामुळे तो सध्या आजोळी पलूस येथे असून, हे दांपत्य लांजात राहत होते. कोरोनामुळे काम बंद असल्याने मनोज लांजा हेरिटेज या इमारतीत भाड्याने फ्लॅटमध्ये राहत होते. काल सायंकाळी सहादरम्यान पत्नी सुशिमा या गॅस संपल्याने बुकिंग करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मनोज एकटेच फ्लॅटमध्ये होते. 

हेही वाचा - तोतया तहसीलदाराने विधवेला फसवले १२ लाखाला

याच दरम्यान त्यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी सुशिमा घरी आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. मात्र, बेडरूमचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी मनोज यांना आवाज दिला. मात्र, ते दरवाजा उघडत नसल्याने पत्नी सुशिमा यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर शेजारी जमा झाले. हाका मारूनही मनोज उत्तर देत नसल्याने अखेर बेडरूमचा दरवाजा तोडण्यात आला. या वेळी मनोज पाटील यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद कांबळे अधिक तपास करीत आहेत. तरुणाचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: working in IT company pune one man attend suicide in his flat yesterday in lanja ratnagiri