#WorldCoconutDay कोकणात नारळ लागवडीला चालना देण्याची गरज

#WorldCoconutDay कोकणात नारळ लागवडीला चालना देण्याची गरज

रत्नागिरी - बारमाही उत्पादन देणारे पीक म्हणून नारळाकडे पाहिले जाते. मात्र, पूरक परिस्थिती असूनही कोकणात त्याच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून प्रचार, प्रसारावर भर देणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर नारळ लागवड झाली. उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत नारळ लागवड अत्यंत कमी असल्याचे मत नारळ बोर्डाचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी व्यक्‍त केले आहे. नारळ उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र देशात महाराष्ट्र 11 व्या क्रमांकावर आहे.

कोकणात नारळ लागवडीला चालना देण्याची आवश्‍यकता आहे. कोकणातील हवामान, पाणी नारळ लागवडीसाठी पूरक आहे. तुलनेत येथील बागायतदार लागवडीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. चार महिन्यांनी सेंद्रीय खत आणि व्यवस्थित पाणी दिल्यास 250 ते 300 नारळ दर चार महिन्यांना मिळतील. 2012 मध्ये जागतिक नारळ दिनी नारळ बोर्डाच्या एका कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन कृषी खात्याच्या सचिवांनी पुढील तीन वर्षांत एक लाख हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, ते उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.

लागवडीसाठी झाडेही कोकणात उपलब्ध आहेत. नरेगा योजनेतून अनुदान मिळते. नारळ बोर्डाकडून मिळालेल्या अनुदानाचा फायदा नगर, सांगली, औरंगाबादमधील बागायतदारांनी घेतला. मात्र, कोकणातून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, अशी खंतही लिमये यांनी व्यक्‍त केली.

आजरा, रोहा आणि पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्‍यातून एक लाख रोपे होतील, अशा नर्सरी बोर्डाच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन लिमये यांनी केले आहे. 

महत्त्व ओळखणे आवश्‍यक 
काथ्या उद्योगासाठी शासनाकडून पाठबळ दिले जात आहे. त्यासाठी कच्चा माल नारळ लागवडीतून मिळेल. भविष्यात असा प्रयोग कोकणात झाल्यास नारळ बागांना महत्त्व प्राप्त होईल. त्यादृष्टीने बागायतदारांनी विचार करणे आवश्‍यक आहे. 

दृष्टिक्षेपात नारळ उद्योग 

  • इंडोनेशिया, फिलिपीन्स, भारत नारळ लागवडीत अग्रेसर 
  • नारळ उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर, देशात महाराष्ट्र 11 वा 
  • उत्पन्नाच्या बाबतीत राज्याचा क्रमांक सातवा 
  • महाराष्ट्रात नारळाखाली क्षेत्र ः 33 हजार 426 एकर 
  • नारळ उत्पादन ः 175.10 दशलक्ष नारळ 
  • भारतात प्रतिहेक्‍टरी सरासरी उत्पन्न ः 7747 
  • महाराष्ट्राते प्रतिहेक्‍टरी उत्पादन ः 8383 

विविध आजारांवर नारळपाणी उपयोगी 
नारळाच्या झाडाच्या पानांपासून छत, टोपल्या, विविध आकर्षक वस्तू बनविल्या जातात. नारळाचे फळ बहुपयोगी आहे. शहाळ्याचं पाणी आरोग्यासाठी हितकारक आहे. शहाळ्याचं कवच वाळवून इंधन स्वरूपात वापरलं जातं. खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी उपयोगी आहे. नारळाच्या फायबरपासून सुतळी, चटई आदी वस्तू बनविल्या जातात. विविधांगी उपयोगामुळे नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम व मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. शरीरातील पाणी प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी नारळ पाणी उपयोगी आहे. पोटॅशिअममुळे अतिरक्तदाब कमी करण्यास मदत होते. नारळाचे पाणी नैसर्गिक असून, त्यात कोणतेही बाह्य कृत्रिम पदार्थ नसतात. त्यामुळे शरीरासाठी ते उत्तम पेय आहे. अँटी ऑक्‍सिडेंट भरपूर प्रमाणात असल्याने किडनी स्टोन कमी होण्यात मदत होते. जे नियमित प्रमाणात नारळाचे पाणी पितात त्यांना शुगरचा त्रास होत नाही. 
- अश्‍विनी अंधारे, आहारतज्ज्ञ, सोलापूर 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com