मत्स्यमंत्र्यांच्या हस्तेच जेट्टीच्या पायभरणीचा नारळ फोडणार ; लिओ कोलासो यांची ग्वाही : Konkan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

harne

'मत्स्यमंत्र्यांच्या हस्तेच जेट्टीच्या पायभरणीचा नारळ फोडणार'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णे (रत्नागिरी) : "रात्र थोडी आणि सोंग फार" या उक्तीप्रमाणे आपल्या समस्या भरपूर आहेत. त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी विधानसभा, लोकसभा , पदवीधर किंवा विधानपरिषद निवडणूक असो याठिकाणी आपला एक तरी प्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे तरच या किनारपट्टीवर आपला निभाव लागू शकेल असे प्रतिपादन महाराष्ट्र मच्छिमार कृति समितिचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी केले. नॅशनल फिशवर्कर्स फोरम ( NFF)महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती ( रजि . ) दापोली - मंडनगड - गुहागर मच्छिमार संघर्ष समिती , हर्णे बंदर यांच्या संयुक्त विद्यमाने काल जागतिक मच्छिमार दिनानिमित्त हर्णेमध्ये आयोजित कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

गेले कित्येक वर्षांपासून मच्छीमारांवर अनेक मोठीमोठी संकटे येत आहेत आणि काही येऊ घातली आहेत. यासाठी मच्छीमार संघटनांचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून अहोरात्र झटत आहेत. आम्हा मच्छीमारांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस जणू काही युद्धाचाच प्रसंग आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगताना वादळ आलं की नौका परत येतात, मासेमारी उद्योग थांबतो तसेच अशी काही वादळं येतात ज्यामध्ये नौका फुटून बुडतात शासन कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. पुन्हा पुनर्वसन होणं तर सोडाच पण तो नौकामालक पुन्हा धंद्यासाठी उभाच रहात नाही. तसेच काही वेळेस मासळी बंपर मिळाली की बाजारत मच्छीचा दरच खाली येतो त्यात नौका मालकांना काहीच फायदा होत नाही.

अवैध मासेमारी बेसुमार चालू आहे. त्याचा कायदा देखील येत नाही. कायदा केलेला आहे परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही याला मंत्रीच कारणीभूत आहेत. तसेच किनारपट्टीवर सरकारकडूनच मोठमोठे प्रोजेक्ट्स आणले जात आहेत. त्यामुळे आपलं अस्तित्व देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. अश्या अनेक समस्या आहेत की ज्या मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम किंवा अन्य मच्छीमार संघटना सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.

विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार या मच्छीमारांकडे लक्षच देत नाहीत. खात्याचे मंत्री तर पूर्णपणे दुर्लक्षच करत आहेत. याकरिता आपल्या समस्या सोडवून घ्यायच्या असतील तर आपल्याला शांत बसून चालणार नाही. विधानसभा, लोकसभा , पदवीधर किंवा विधानपरिषद असो याठिकाणी आपला एक प्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे तरच आपल्या समस्यांचं निवारण करायला संधी मिळेल. हर्णे बंदराच्या जेटीचा प्रश्नदेखील गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहिला आहे.

हर्णे बंदर कमिटीकडून मच्छीमार दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करताना ते म्हणाले, यावर्षीच्या जागतिक मच्छीमार दिनाचे कार्यक्रमाचे यजमानपद हर्णे गावाला प्रथमच दिले गेले. परंतु अतिशय शिस्तबद्ध आणि सुस्थितीत अस आयोजन या कमिटीने केलं आहे. आपल्या कोळीनृत्यावर महिला वर्ग नाचत कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत आल्या त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. यावर्षी हर्णे गावामध्ये मच्छीमार दिन साजरा केला तर पुढच्या वर्षीच यजमानपद माझ्या ठाणे जिल्ह्यातील उत्तनकडे असेल आणि त्यावेळी तिथे जे कोणीही विद्यमान मत्स्यव्यवसाय मंत्री असतील त्यांना तेथे आणून जागतिक मच्छीमार दिनाच्या निमित्ताने एखाद्या जेट्टीच्या पायभरणीचा नारळ फोडून घेऊ याची मी तुम्हाला ग्वाही देतो असे महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी आपले मत मांडताना सांगितले.

उपस्थित मान्यवरांपैकी अनेकांनी आपली मते याठिकाणी मांडली. सर्व मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला अनेकांनी यामध्ये कोळी नृत्यावरच डान्स केले. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर पावसे यांनी केले.

loading image
go to top