esakal | World Tourism Day Special : ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ कोकणची गरज ; रोजगारनिर्मितीसाठी नव्या दिशा शोधाव्या लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

world tourism day special research story by shiv prasad desai

मायक्रो प्लॅनिंग झाले तर संधी

सरकारचे  सहकार्य गरजेचे

World Tourism Day Special : ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ कोकणची गरज ; रोजगारनिर्मितीसाठी नव्या दिशा शोधाव्या लागणार

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी : कोरोनाच्या सावटाखालीच सिंधुदुर्गासह कोकणात पर्यटन पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे; मात्र हा प्रवास सोपा नाही. पर्यटनाच्या बऱ्याच संकल्पना आता नव्याने रूढ होणार आहेत. यात टिकायचे असेल तर ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ संकल्पना प्रकाशात आणावी लागेल. यात मायक्रो प्लॅनिंग करावे लागणार आहे. कोकणात गेल्या काही वर्षांत पर्यटन वेगाने पुढे जात होते. कृषी क्षेत्रानंतर रोजगारनिर्मितीत या क्षेत्राने स्थान मिळवले होते; मात्र कोरोनाच्या झटक्‍याने कोकणचे पर्यटन 
अडचणीत आले आहे. कर्ज काढून गुंतवणूक केलेले अनेक व्यावसायिक खूप मोठ्या आर्थिक संकटात आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कोकणच्या पर्यटनाला नवी दिशा देणे आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने येथील व्यावसायिक प्रयत्नही करत आहेत; मात्र याची दिशा आता पूर्ण बदलावी लागणार आहे. 


जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक, काही व्यावसायिकांशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. कोकणला पर्यटनात पुन्हा उभे राहण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करावे लागणार आहे. केवळ हॉटेलचे दरवाजे उघडून पर्यटन उभारी घेणार नाही. कोरोनामुळे जितक्‍या अडचणी आल्या तितक्‍या संधीही चालून येणार आहेत. त्या मिळवणारा यात ‘किंग’ ठरणार आहे.
सद्यस्थितीत पूर्ण देश आर्थिक संकटात आहे. अशा वेळी थेट रोजगार आणि उत्पन्न देणारे पर्यटन हे एकमेव क्षेत्र आहे. यामुळे इतर राज्येही पर्यटनवाढीसाठी धोरणे राबवणार आहेत. लगतच्या गोव्याची कोकणशी स्पर्धा असणार आहे. अशा स्थितीत कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना खूप काळजीपूर्वक पुढचा काही काळ यात उतरावे लागणार आहे. 


कोरोनावर लस आली तरी आरोग्याविषयी असुरक्षितता इतक्‍यात कमी होईल, अशी शक्‍यता नाही. शिवाय आर्थिक चणचणीमुळे या क्षेत्रात खर्च करणाऱ्यांचा हात आखडता असणार आहे. याच्या जोडीला महागडे परदेशी पर्यटन करणारे आता जवळचा पर्याय शोधणार आहेत. यामुळे कोकणात पर्यटकांना आकर्षित करायला संधी आहे. एकदम गर्दी होईल अशा ठिकाणांना पर्यटक किती पसंती देतील, हा प्रश्‍न आहे. यामुळे गोव्याला आपला कोकण पर्याय ठरू शकतो. अर्थात, यासाठी जबाबदार म्हणजेच रिस्पॉन्सिबल टुरिझम संकल्पना राबवावी लागेल. यात मायक्रो प्लॅनिंग महत्त्वाचे असेल. येथील व्यावसायिकांना पर्यटकांचा त्यांच्या घरापासूनचा प्रवास प्लॅन करावा लागेल. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून आलेल्या पर्यटकांविषयी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असुरक्षिततेची भावना असणार आहे.

अख्खा सीझन गेल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट आहे; पण यामुळे एकदम दर वाढवूनही चालणार नाही. कारण या क्षेत्रावर पर्यटकांचे खर्च होणारे बजेटही कमी झाले आहे. यासाठी ग्रुप टुरिझमसारख्या संकल्पना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. यातही सॅनिटायझेशन, आरोग्यविषयक सुविधांचा विश्‍वास निर्माण करावा लागेल. पर्यटन पॅकेजला विमा संरक्षण व इतर काही गोष्टी जोडता येतील का, हे पाहावे लागेल. 

हेही वाचा- पर्यटन दिन विशेष : आगामी पर्यटनासाठी पर्यटक आतूर• -


पूर्वी धार्मिक पर्यटन चालायचे. नव्वदच्या दशकात बीच टुरिझम विस्तारले. आता तर समुद्र किनाऱ्यापासून पर्यटन सुरू होऊ लागले होते. यात स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, वॉटर स्पोर्टस्‌ आदींचा समावेश होता. आता लोक आरोग्य सुरक्षितता, निवांतपणा आदीला प्राधान्य देण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुन्हा पर्यटनाची संकल्पना संक्रमण स्थितीत येऊ शकते. अशा वेळी ॲग्रो टुरिझम, फॉरेस्ट टुरिझम अशा संकल्पनांकडे पर्यटक वळू शकतात. याला सिंधुदुर्गात चांगली संधी आहे. येथील व्यावसायिक हा व्यवसाय आपल्याकडे कसा वळवू शकतील, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. सागरी पर्यटन नव्या संकल्पना घेऊन येऊ शकते. यात व्यावसायिकांची कल्पकता महत्त्वाची असेल. हे सर्व खरे असले तरी पुढचा वर्षभराचा काळ संघर्षाचा असणार आहे. व्यावसायिकांना आर्थिक गणित बसवणे कठीण बनणार आहे. यात मायक्रो प्लॅनिंग करणारा अधिक चांगल्या पद्धतीने यात तरेल. यातून नव्या संधीही निर्माण होतील. कोकण त्या किती प्रभावीपणे स्वीकारते, यावर इथल्या पर्यटनाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. 

येत्या काळात स्थानिक पर्यटनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. कोकणात आतापर्यंत येथील व्यावसायिकांनीच पर्यटन वाढवले आणि टिकवले. एमटीडीसीसारख्या यंत्रणेने पर्यटनवाढीसाठी फारसे काही केले नाही. आता एमटीडीसीवर अवलंबून न राहता पर्यटन मंत्रालयाने इथल्या व्यवसायाला थेट मदत देणे आवश्‍यक आहे. नवे व्यावसायिक उभे करायला हवेत. येथील लोकच पर्यटन वाढवणार आहेत. फक्‍त सरकारचे प्रामाणिक सहकार्य हवे.
- डी. के. सावंत, पर्यटन व्यावसायिक

संपादन - अर्चना बनगे