World Tourism Day Special : रत्नागिरीत पर्यटन व्यावसायाला दोन हजार कोटीचा फटका

राजेश कळंबट्टे
Sunday, 27 September 2020

 

कोविडचे सावट; हॉटेल्स, लॉजिंगसह मंदिर दर्शनाची प्रतिक्षा

रत्नागिरी :  कोविडमधील टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यावसायावर झाला. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना 2 हजार कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. जिल्हा बंदी उठली तरीही पर्यटन व्यावसाय ठप्पच आहे. हॉटेल्स, लॉजिंगही पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत तर मंदिरांमधील दर्शन बंदच आहे. त्याला चालना मिळाली तरच पर्यटन व्यावसायाला भरभराट येईल.

हेही वाचा- आंबोलीत ट्रक नदीत कोसळून एक बेपत्ता -

मार्च महिन्यात कोरोनातील टाळेबंदीला सुरु झाली. रेल्वे, एसटीसह खासगी वाहतूक बंदी झाली. देशाचे अर्थचक्र पूर्णतः थांबले. याचा सर्वाधिक फटका कोकणातील पर्यटनाला बसला. वर्षभरातील पन्नास टक्के हंगाम हा मे महिन्यावर अवलंबून असतो. त्याचवेळी कोरोनाचे संकट आल्यामुळे हॉटेल, लॉजिंगसह छोटे-मोठे व्यावसायिक उध्वस्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन उद्योगात सात प्रकारची हॉटेल्स आहेत. त्यातील नोंदणीकृत छोटी-मोठी मिळून 1200 हॉटेल्स आहेत. यावर कामगार, वाहतुकवाले, दूध, किराणा, किरकोळ साहित्य विक्रेते, फोटोग्राफर, किनार्‍यांवरील नारळ विक्रेते, खेळणी विक्रेते अशा हजारो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हे सर्वच ठप्प झाल्याने 2000 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. कर्ज काढून सुरु केलेले व्यावसायाचे हप्त थकले आहेत.

शासनाने जिल्हा बंदी उठवली असली तरीही पर्यटनावर कोरोनाची भिती कायम आहे. दापोली, गणपतीपुळे किनार्‍यावर वन डे ट्रीप साठी पर्यटक येत आहेत. पण हॉटेल, लॉजिंग बंद असल्याने ते निघून जात आहे. मुंबई, पुण्यातील पर्यटकांचा ओढा दापोलीतील किनार्‍यांकडे असून तेथील लॉजिंगला आरक्षणासाठी मागणी येत आहे. सहा महिने खितपत पडलेला पर्यटक पुन्हा पर्यटनाकडे वळण्याच्या मार्गावर आहे, पण मंदिरे बंद असल्याने हात आखडता घेतला जात आहे. मंदिरे उघडी की दर्शनाच्या निमित्ताने दिवाळी, ख्रिसमसच्या सुट्टीत पर्यटनाला वेग येईल. त्यासाठी पर्यटन व्यावसायिक सज्ज असले तरीही त्यावर कोरोनाची भिती कायम राहणार आहे. यंदा परदेशात फिरायला जाणारा पर्यटक कोकणातील किनार्‍यांकडे वळेल असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पर्यटनाला नवा साज द्यावा लागेल. 

हेही वाचा-सिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा -

पर्यटनच बंद झाल्यामुळे व्यावसायिकांची हानी झाली आहे. काही कोटी रुपयांचा फटका बसला असून तो भरुन काढण्याचे आव्हान आहे.

- सुहास ठाकुरदेसाई, पर्यटन व्यावसायिक

 

कोरोनातील टाळेबंदीमुळे कर्जाचे हप्ते थकले आहे. या व्यावसायाल चालना कधी मिळेल हे सांगणे आताच शक्य नाही. त्यामुळे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी आशा आहे.

- प्रमोद केळकर, गणपतीपुळे

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world tourism day special story 2000 crore blow to tourism business in ratnagiri