व्हिडीओ : काय होणार ? चाकरमानी गणेशोत्सावला पोहोचणार का..?

शिवप्रसाद देसाई
शनिवार, 4 जुलै 2020

कोकण आणि गणेशोत्सव यांचे नाते नुसते धार्मिक नाही तर भावनिकही आहे. कोकणातील गावपाड्यात अजूनही वर्षभर बंद असलेली टुमदार घरे गजबजण्यासाठी चतुर्थीची वाट बघतात.

सिंधुदुर्ग - कोकणाला यंदा गणेशोत्सवाचे वेध जरा लवकरच लागले आहे. याचे कारण आहे कोरोना. यंदा मुंबई-पुणेकर लाखो चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी गणपतीला येता येईल का त्याची चिंता सतावते आहे. अनेक वर्षभर बंद असणाऱ्या घरांमध्ये चाकरमानी चतुर्थीला येवून गणेशोत्सव साजरा करतात. त्या घरांची कुलपे उघडणार का? अशी चिंता त्यांना सतावत आहे. कित्येक घरांमध्ये म्हातारे आई-बाप कॅलेंडरकडे आणि आपल्या मुंबई-पुण्यात स्थिरावलेल्या लेकरांकडे डोळे लावून आहेत. प्रशासन याबाबत धोरण ठरवण्याचा विचार करत असले तरी चित्र अजूनही अस्पष्ट आहे. 

कोकण आणि गणेशोत्सव यांचे नाते नुसते धार्मिक नाही तर भावनिकही आहे. कोकणातील गावपाड्यात अजूनही वर्षभर बंद असलेली टुमदार घरे गजबजण्यासाठी चतुर्थीची वाट बघतात. कित्येक घरांमध्ये म्हातारे आई-बाप आपल्या मुलाबाळांच्या परतण्याकडे चतुर्थीच्या निमित्ताने डोळे लावून असतात. यंदाचा हा उत्सव मात्र कोरोनाचे गडद सावट घेवून आला आहे. चतुर्थीला हे भावनीक बंध जुळणार की वर्षानुवर्षाची ही परंपरा खंडीत होणार अशी अस्वस्थ करणारी स्थिती निर्माण झाली आहे. 
यंदा लवकर म्हणजे 22 ऑगस्टला गणेशचतुर्थी आहे. अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कोकणात सार्वजनिक मंडळे फार कमी आहेत; मात्र घरगुती गणेशोत्सवाची परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे. या निमित्ताने अख्ख कोकण आनंदाने डोलत. हे चैतन्य पुढचे वर्षभर पुरत. अनेक घरांमध्ये उत्सव साजरा करण्याची जबाबदारी नोकरीनिमित्त मुंबई-पुण्यात स्थाईक असलेल्या मुलांवर असते. ते कुटुंबासह या सणानिमित्त गावात दाखल होतात. पण यंदा त्यांचा रस्ता कोरोनाने अडवला आहे. 

कोकणात सुरूवातील कोरोनाचे रूग्ण कमी होते. मुंबई-पुणेकरांना जिल्ह्यात घ्यायला सुरूवात केल्यानंतर ही संख्या वाढत गेली. आतातर काही स्थानिकांनाही कोरोनाची बाधा होवू लागली आहे. अशा स्थितीत गणेशोत्सवाला यायचे झाल्यास चाकरमान्यांना ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात येवून कॉरंटाइंन व्हावे लागणार आहे. यामुळे त्यांचा पूर्ण महिना या सणासाठी खर्च करावा लागणार आहे. हा प्रवास ईतका सोपाही नाही. कारण ते कुटुंबासह दाखल होणार असल्याने भरमसाठ गाडीभाडे, पासची किचकट प्रक्रिया आणि येथे आल्यानंतर कुटुंबासह कॉरंटाईनची व्यवस्था असे कितीतरी अडथळे त्यांच्या प्रवासात आहेत. 

सिंधुदुर्गात प्रशासनाने यावर काम करायला सुरूवात केली होती. पण अचानक रूग्णसंख्या वाढल्याने तुर्तास या नियोजनाला ब्रेक लागला आहे. असे असलेतरी प्रशासन इतक्या दिवसाच्या क्वारंटाईन पिरीएडचा विचार करता किती चाकरमानी येतील याबाबत साशंक आहे. तरीही क्वारंटाईनची प्रक्रिया थोडी सोपी करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. आता संस्थात्मक क्वारंटाईन, होम क्वारंटाईन अशा प्रमुख दोन मार्गाने प्रक्रिया चालते. होम क्वारंटाईन झाल्यास स्वतंत्र घर आवश्यक असते. चतुर्थी काळात अशी घरे उपलब्ध होणे कठीण आहे. यामुळे रूम क्वारंटाईन संकल्पना आणण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यात घरातील एका खोलीत क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. घरातील इतर व्यवहार तसेच चालू राहतील. सध्या चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी आहे. त्याबाबतही विचार केला जावू शकतो. 
यातही अडचणी आहेत. प्रशासनाने अंतिम अधिकार ग्रामकमिट्यांना दिला आहे. बर्‍याच गावात स्थानिक पातळीवर होम क्वारंटाईनला विरोध होत आहे. या समित्या रूम क्वारंटाईन संकल्पना कितपत स्विकारतील हा प्रश्‍न आहे. 

असे असले तरी प्रशासनाला याबाबतची भूमिका लवकरच स्पष्ट करावी लागणार आहे. चाकरमानी आणि कोकणवासीय यांची अस्वस्थता वाढली आहे. हा सण साजरा करण्याबाबतची नियमावली ही स्पष्ट करावी लागणार आहे. हा सण प्रामुख्याने लोकांना एकत्र आणणारा असतो. त्यामुळे या नियमावलीत स्पष्टता असणे आवश्यक आहे. गणेशोत्सवासाठी येणार्‍यांमुळे कोरोनाचा प्रसार कोकणात वाढणार नाही याची दक्षताही घ्यावी लागणार आहे. 

हे पण वाचा - सिंधुदुर्ग स्वप्नपूर्तीच्या दिशेन; मेडिकल काॅलेजला मंजूरी, कोणी केली घोषणा...

“सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सव काळातील नियोजनाबाबत काम सुरू आहे. याचा अहवाल लवकरच तयार होईल. यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील.”

- शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

“गणपती उत्सव जवळ आला आहे. यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने येणार आहेत. या काळात कोरोना वाढू नये म्हणून ठोस नियोजन केले जाईल. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती नियोजन आराखडा प्रशासनाला सादर करेल त्याला मंजूरी दिली जाईल.”

- उदय सामंत, पालकमंत्री सिंधुदुर्ग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worried whether Ganpati about will be able to come to his village in Konkan