घरगुती गणेशोत्सवासाठी यंदा चाकरमान्यांनी लढवली `ही` शक्कल

राजेश कळंबटे
Sunday, 16 August 2020

हातिस, टेंब्ये ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर यांनी सुंदर पर्याय काढला. मुंबईकर चाकरमान्यांशी संवाद साधून ज्यांना येणे शक्‍य नाही, त्यांच्या घरात गणेशोत्सव वाडीतील कृतिदल गणेशोत्सव साजरा करतील.

रत्नागिरी - गणेश चतुर्थीला घरात गणपती बसवून पूजाअर्चा करण्याची परंपरा आहे. ती कोरोनातील टाळेबंदीमुळे खंडित होऊ नये यासाठी हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृतिदलाने सकारात्मक संकल्पना राबविली आहे. मुंबईतून येणे शक्‍य नसलेल्या चाकरमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याची जबाबदारी वाडी कृतिदलाने स्वीकारली असून त्यावर होणारा खर्च मुंबईतून चाकरमानी पाठवून देणार आहेत. ही संकल्पना आदर्शवत असून मुंबईकर चाकरमान्यांची गावाकडील घरी गणपती आणण्याची इच्छापूर्ती करणेही शक्‍य होणार आहे. 

विलगीकरणाच्या नियमांमुळे अनेक मुंबईकर चाकरमान्यांची गणेशोत्सव करण्याची इच्छा अर्पूण राहण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. ज्या चाकरमान्यांना गावाकडे यायचे होते, त्यांच्यासाठी दहा दिवसांचा विलगीकरण कालावधी ठेवण्यात आला होता. मुंबईतून आल्यानंतर गावी दहा दिवस विलगीकरण, पाच दिवसांचा गणेशोत्सव आणि पुन्हा मुंबईत गेल्यानंतर तिकडे चौदा दिवस विलगीकरण या अटींमुळे नोकरदार मंडळींना गावाकडे येणे अशक्‍य आहे. एका दिवसासाठी यायचं म्हटलं तरीही कोरोना चाचणी अत्यावश्‍यक केली आहे.

या परिस्थितीमध्ये गावाकडील बंद घरात गणेशोत्सवाची पूजाअर्चा कशी होणार अशीच हुरहूर अनेकांना आहे. यावर हातिस, टेंब्ये ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर यांनी सुंदर पर्याय काढला. मुंबईकर चाकरमान्यांशी संवाद साधून ज्यांना येणे शक्‍य नाही, त्यांच्या घरात गणेशोत्सव वाडीतील कृतिदल गणेशोत्सव साजरा करतील. 

गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांच्या स्वागतासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांविषयी कृतिदलाची बैठक झाली. त्यामध्ये सर्वांनी चर्चा करून यावर निर्णय घेतला. त्यास अनेकांचा सकारात्मक प्रतिसादही लाभला. 

श्रीमती नागवेकर यांनीही जवळच्या घरातील गणेशोत्सव साजरा करण्याची हमी घेतली आहे. त्यासाठी येणारा खर्च चाकरमानी संबंधित वाडीकृतिदलाच्या सदस्यांना देणार आहेत. घरात गणपती आणण्याची प्रचंड इच्छा होती; परंतु कोरोनातील परिस्थितीमुळे चाकरमान्यांची इच्छापूर्ती होणे शक्‍य नव्हते. गावाकडून ही संकल्पना सांगितल्यानंतर त्याला लगेचच होकार दिला गेला. 

हातिस-टेंब्ये गावात मुंबईतून सुमारे शंभर चाकरमानी गणेशोत्सवासाठी दाखल झाले आहेत. त्यांना शासनाच्या नियमानुसार होम क्‍वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. त्यांना घरच्या घरीच भाजीपाला, किराणा साहित्य यासह वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम कृतिदलाने पावले उचलली आहेत. त्यामुळे चाकरमानीही स्वखुशीने राहत आहेत. 

गावातील घरात गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी वाडी कृतिदल घ्यायला तयार आहे, असे आवाहन मुंबईकर चाकरमान्यांना केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून काही लोकांनी तयारी दर्शवली आहे. 
- कांचन नागवेकर, सरपंच 
 

संपादन - राजेंद्र घोरपडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Year Mumbai Serviceman Celebrating Ganesh Festival This Way