esakal | शृंगारपुरात होणार येसुबाईंचे स्मारक 
sakal

बोलून बातमी शोधा

Yesubai Monument In Shrungarpur Ratnagiri Marathi News

महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर हे माहेर. या गावात जन्मलेल्या येसूबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई झाल्या आणि गावाचे ऐतिहासिक महत्व वाढले. येसूबाईंचे स्वराज्यातील योगदान मोलाचे आहे.

शृंगारपुरात होणार येसुबाईंचे स्मारक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त राजांच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर हे माहेर असल्याने या गावात त्यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना कसबा येथील ज्येष्ठ नागरिक मुरलीधर बोरसूतकर यांनी मांडली असून शंभूप्रेमींनी ती उचलून धरली आहे. 

महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर हे माहेर. या गावात जन्मलेल्या येसूबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई झाल्या आणि गावाचे ऐतिहासिक महत्व वाढले. येसूबाईंचे स्वराज्यातील योगदान मोलाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचे शृंगारपूरसह कसबा या गावात वारंवार जाणं-येणं असायचे. कसबा येथील सरदेसाई यांच्या वाड्यात स्वराज्यातील न्यायनिवाडा चालायचा. शृंगारपूरच्या जवळच प्रचितगडाची उभारणी झाल्याने हा गड तेव्हापासून सह्याद्रीचा मुकुटमणी म्हणून ओळखला जाऊ लागला. 

स्वराज्यात खूप मोठ्या उलथापालथी झाल्या आणि संभाजीराजे दगाबाजीने कसबा गावी पकडले गेले. छत्रपती संभाजी राजांच्या पश्‍चात महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यात धाडसाने लक्ष घातले आणि जबाबदारीने राज्यकारभार केला. त्यांनाही तब्बल 29 वर्षे शत्रूच्या बंदिवासात काढावी लागली. शंभू राजांइतक्‍याच संयमी असलेल्या या राणीचे माहेरघर असतानाही त्यांची ओळख येणाऱ्या पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना व्हावी असे काहीच उभारले गेले नाही. 

कसबा येथील ज्येष्ठ नागरिक मुरलीधर बोरसूतकर यांनी संभाजीराजांच्या बलिदान मासात संभाजीप्रेमी तरुणांसमोर शृंगारपूर येथे महाराणी येसूबाई यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना मांडली आणि उपस्थितांनी ती लगेचच उचलून धरली, त्यामुळे उशिरा का होईना स्मारकाच्या माध्यमातून येसूबाईंना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

वाड्याचा चौथरा शिल्लक 

कसबा येथे 80 लाख रुपये खर्च करुन महाराजांची पूर्णाकृती प्रतिमा उभी केली आहे. इतिहासातील स्मारके लाखोंची उड्डाणे घेत असताना महाराणी येसूबाई मात्र दुर्लक्षितच राहिल्या आहेत. येसूबाई या शृंगारपुरातील शिर्के घराण्यातील होत्या. आज त्यांच्या वाड्याचा चौथरा फक्त शिल्लक आहे. येथे नतमस्तक होण्यासाठी येणारे पर्यटक या चौथऱ्यावर डोकं ठेवून जातात. 
 

loading image