बहिणीच्या लग्नपत्रिका वाटून घरी येताना तरुणाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कणकवली - बहिणीच्या विवाहाचे निमंत्रण नातेवाईकांना देऊन कणकवलीकडे परतत असताना भरधाव डंपरने धडक दिल्याने हुंबरठ येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमितकुमार चंद्रकांत चव्हाण (वय ३०, मूळ रा. हुंबरठ, सध्या रा. आशिये) असे त्याचे नाव आहे. अपघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फोंडाघाट हवेलीनगर येथे झाला.

कणकवली - बहिणीच्या विवाहाचे निमंत्रण नातेवाईकांना देऊन कणकवलीकडे परतत असताना भरधाव डंपरने धडक दिल्याने हुंबरठ येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमितकुमार चंद्रकांत चव्हाण (वय ३०, मूळ रा. हुंबरठ, सध्या रा. आशिये) असे त्याचे नाव आहे. अपघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फोंडाघाट हवेलीनगर येथे झाला.

काही दिवसांवर विवाह सोहळा असलेल्या घरात तरुणकर्त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर अपघातस्थळी मोठा जमाव जमला होता. सर्व राजकीय पक्षाच्या मंडळींनी धाव घेत डंपर चालकास तत्काळ अटक करा; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांचे पथक दाखल झाले.

तरीही उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता. 
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी - अमितच्या बहिणीचे लग्न येत्या २७ एप्रिलला आहे. निमंत्रण पत्रिका घेऊन अमित फोंडाघाट परिसरातील नातेवाईकांकडे दुपारी गेला होता. तेथून तो कणकवलीला येत असताना फोंडाघाट येथे एका हॉटेलमध्ये जेवण घेतले. तेथून मोटारसायकलीवरून (एम एच ०७ एएफ २७६३) तो येत असताना डंपरला (एम एच ०७ -१४६९) बाजू देऊन पुढे जात होता. या वेळी डंपरची धडक त्याच्या दुचाकीला बसली. अपघातात त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच तडफडत होता. बऱ्याच काळाने वाहनचालक गोळा झाल्यानंतर लक्षात आले की त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच फोंडाघाट पोलिस दूरक्षेत्राचे दयानंद चव्हाण व भगवान नागरगोजे यांनी पंचनामा केला. मोठा जमाव जमल्याने निरीक्षक कोळी घटनास्थळी आले. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

अमित भाजपचा कार्यकर्ता होता. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील अनेकजण त्याचे मित्र होते. त्यामुळे घटनास्थळी राजकीय कार्यकर्ते आक्रमक होते. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, सरपंच संतोष आग्रे, भाजप तालुकाध्यक्ष संदेश सावंत (पटेल), पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, राजू रावराणे, राजन चिके, भालचंद्र राणे, आनंद मर्ये, पिंटू पटेल आदी उपस्थित होते. अमितच्या मागे आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youngster dead in an accident in Phondaghat