व्वा..कोकणच्या सुपुत्राची अशीही विठ्ठलभक्ती...कलेलाही सलाम

नेत्रा पावसकर
बुधवार, 1 जुलै 2020

अशाच एका विठ्ठलाच्या कलावंत भक्ताने आगळीवेगळी एकादशी साजरी करायचे ठरविले. अत्यंत लहान 3 सेमी लांबीची आणि अत्यंत मोठी 340 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिकृती निर्माण केली. 

तळेरे (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे अनेक विठ्ठल भक्तांची पंढरपूर वारी चुकली. अनेकांनी घरीच एकादशी साजरी करायचे ठरविले; परंतु गवाणे येथील अक्षय मेस्त्री याने अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत मोठी अशी दोन विठ्ठलाची चित्रे साकारून "घरीच रहा, मी तुमच्या सोबतच आहे', असा संदेश दिला आहे. त्यामुळे यावर्षीची एकादशी आगळीवेगळी ठरणार असल्याचे अक्षयने बोलून दाखविले. 

यावर्षी कोरोनामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भेट घ्यायची अनेकांचे राहून जाणार. अनेकजण पिढ्यानपिढ्या पायी वारी करून लांबच्या पल्ल्यावरून पंढरपूरला जातात; मात्र त्यामध्ये यावर्षी खंड पडणार आहे. तरीही वारकऱ्यांच्या मनामधील भक्तीचा मळा कमी झालेला नाही. अशाच एका विठ्ठलाच्या कलावंत भक्ताने आगळीवेगळी एकादशी साजरी करायचे ठरविले. अत्यंत लहान 3 सेमी लांबीची आणि अत्यंत मोठी 340 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिकृती निर्माण केली. 

तुळशीच्या लहान पानावर विठ्ठलाचे रुप अक्षयने रेखाटले आहे. 3 सेंटीमीटर लांब आणि 1 सेमी रुंद असलेल्या त्या पानावर अक्षयने अवघ्या तासाभरात विठ्ठलाचे रुप साकारले. याबाबत अक्षय म्हणाला, की लॉकडाउनमुळे कॅनव्हास आणि इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे गप्प बसून राहण्यापेक्षा सराव महत्त्वाचा आहे. चित्रकला ही सरावा शिवाय साध्य होत नाही. त्यामुळे एकादशीचे निमित्त साधून विठ्ठलाचे चित्र तुळशीच्या पानावर काढले.

त्यातून विठ्ठल भक्तांना विठ्ठल दर्शन घडू शकेल. दुसरीकडे 20 दिवसांपासून गवाणे येथील दीड एकर जमिनीत सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षय भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारत आहे. त्याने माळरानावर पावसाळी येणाऱ्या गवतामध्ये विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. त्या विठ्ठलाच्या चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट आहे. 

अनेकांची मदत 
हे भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारण्यासाठी अक्षयला प्रकाश पावरा, गुरूथास साटम, सिद्धेश राणे, रोहित वरक, शुभम राडये, ऋषिकेश आयरे, राकेश तोरस्कर यांनी मदत केली. या चित्रामागील कल्पना विचारली असता अक्षयने सांगितले, की कलाकाराने प्रत्येकवेळी सराव केला पाहिजे. त्यासाठी साधने मिळाली नाहीत तर उपलब्ध साहित्यातून कला निर्मितीचा आस्वाद आणि आनंद घेता आला पाहिजे. सध्या लॉकडाउन असल्याने अनेकजण निवांत होते. त्यांना मदतीला घेऊन हे चित्र साकारण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth Draw a picture of Vithuraya gavane konkan sindhudurg