अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा उपयोग करत तरुण खेळवतोय २४ तास वीज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

गेली चार वर्षे सोलर, पवनचक्‍कीची वीज तो वापरत आहे. यावर पाण्याचा पंपच नव्हे, तर दगड फोडणारा ब्रेकरही चालवून त्याने घराचा परिसर स्वच्छ केला.

रत्नागिरी : भौगोलिकदृष्ट्‌या अडचणीचा प्रदेश असलेल्या कोकणात अनेक ठिकाणी वीज पोचलेली नाही. यावर मात करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा उपयोग करीत घरात २४ तास वीज खेळवली आहे, तालुक्‍यातील फणसोप सडा येथील दीपराज पारकर या तरुणाने. गेली चार वर्षे सोलर, पवनचक्‍कीची वीज तो वापरत आहे. यावर पाण्याचा पंपच नव्हे, तर दगड फोडणारा ब्रेकरही चालवून त्याने घराचा परिसर स्वच्छ केला.

हेही वाचा - एसटी कंडक्टरच्या मृत्यूचे गूढ कायम ; मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत पाहून सर्वच चक्रावले -

दीपराज बी. कॉम. झाला. फणसोप सडा येथील माळरानावर त्यांनी चार वर्षांपूर्वी जागा घेतली. तिथे महावितरणची वीज पोचण्यासाठी पावणेदोन लाखाचा खर्च अपेक्षित होता. तो परवडणारा नव्हता. जनरेटर घेणेही न परवडणारा. त्याने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतातून वीज निर्मितीचा चंग बांधला. त्यासाठी ऑनलाईन माहिती घेण्यास सुरवात केली. तीनशे वॅटचे सोलर पॅनल मागवले. वीज स्टोअरेजसाठी आवश्‍यक बॅटरी घेतली. त्याला २५ हजार रुपये खर्च आला. हेवी मशीन चालविण्यासाठी दोन हजार वॉटचा इर्न्व्हटर घेतला. त्याची जोडणीही स्वतःच केली. सोलरचे पॅनल बसवण्यासाठी ऋषीकेश कामतेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

पॅनल बसविल्यानंतर पहिला प्रयोग विहिरीवरील पंप चालविण्यासाठी केला. तो यशस्वी झाल्यानंतर लोड हळूहळू वाढवण्यासाठी सुरवात केली. घरात चोविस तास उजेड आणि फॅन सुरु झाला. दीपराज कॉम्प्युटरची कामे करीत असल्याने वीजेचा वापर अधिक. मिक्‍सर, फ्रिज, टीव्ही यासह पाणी खेचण्यासाठी एक एचपी पंपही त्यावर चालत आहे.

घराभोवतीचा कातळ फोडण्यासाठी ब्रेकर मशिन चालवले. त्याला १५०० वॉटची गरज लागते. तीही भागवली गेली. उन्हाळ्यात वीज मिळत होती; परंतु पावसाळ्यात अडचणी येऊ लागल्या. बॅटऱ्या व्यवस्थित चार्जिंग होत नव्हत्या. त्याला पर्याय म्हणून पवनचक्‍की उभारली. पुन्हा ऑनलाई सर्चिंग केले आणि १४ हजार ५०० रुपयांची पवनचक्‍की घेतली. तिचे फिटिंग दीपराज याने स्वतःच केले. मोकळा भाग असल्याने वारा चांगला असल्याने आवश्‍यक तेवढी वीजही मिळत आहे.

हेही वाचा -  दुर्लक्षच नडला ; सरपंच, उपसरपंच मुकले पदाला

"एवढी वीज वापरल्यावर महिन्याला किमान वीजबिल ११०० रुपये आले असते. आतापर्यंतच्या खर्चात सोलर, पवनचक्‍कीतून २४ तास वीज मिळत असून, ‘महावितरण’ला द्यावयाचे पावणेदोन लाख वाचले. देखभाल दुरुस्तीचा खर्च नसल्याने पाच ते सात वर्षे ही वीज कायम मिळणार आहे."

- दीपराज पारकर, फणसोप सडा

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth in konkan start a new project of electricity with help of solar project in ratnagiri