
मालवण राणेंचे की शिवसेनेचे ?
मालवण : राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून मालवण तालुका ओळखला जातो. यावर गेली बरीच वर्षे नारायण राणे यांचेच वर्चस्व राहिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणेंना पराभव पत्करावा लागला. यानंतरही या तालुक्याचा आमदार शिवसेनेचा असला, तरी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ, बऱ्याच ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. या वेळी तालुक्यात एक गट आणि दोन गणांची निर्मित होत आहे. त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातच सत्तेसाठी मोठी चढाओढ असणार आहे.
श्री. राणे काँग्रेसमध्ये असताना तालुक्यातील सहा जिल्हा परिषद मतदार संघातील पाच मतदार संघावर व दहा पंचायत समिती मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसमधून राणे बाहेर पडल्यानंतर स्वाभीमानचा गट स्थापन झाला. आता राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. पंचायत समिती मतदार संघातील कमलाकर गावडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पंचायत समितीतील शिवसेनेचे संख्याबळ तीन झाले. तर राष्ट्रवादीचे विनोद आळवे हे एकमेव सदस्य पंचायत समितीत आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या संतोष साटविलकर, जेरॉन फर्नांडिस, महेंद्र चव्हाण यांना बांधकाम सभापती पद तर माधुरी बांदेकर यांना महिला व बालकल्याण सभापतीपद मिळाले आहे.
तालुक्यातील देवबाग जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे हरी खोबरेकर हे एकमेव सदस्य निवडून आले आहे. यातील केवळ देवबाग या गणातून शिवसेनेच्या मधुरा चोपडेकर या एकमेव सदस्य निवडून आल्या. आचरा गणातून शिवसेनेच्या निधी मुणगेकर या निवडून आल्याने पंचायत समितीत शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. मधल्या काळात कमलाकर गावडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सद्यःस्थितीत शिवसेनेचे संख्याबळ तीन झाले आहे. आता तालुक्यात नव्या गटाची निर्मिती होत आहे. त्यामुळे एक गट आणि दोन गणांच्या संख्येमुळे जिल्हा परिषदेचे सात तर पंचायत समितीचे चौदा गण अशी संख्या असणार आहे.
सुरवातीस पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते; मात्र राणेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा परिषदेचे पाच आणि पंचायत समितीचे नऊ गण भाजपच्या ताब्यात गेले आहेत. आता नव्या गटाची आणि दोन गणांची होणारी निर्मिती तसेच पडणारे आरक्षण याकडे विद्यमान सदस्यांसह, इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या गटातील किंवा गणातील गाव अन्य गणात गेल्यास काय परिस्थिती निर्माण होईल याची चाचपणी सध्या इच्छुक सदस्यांकडून केली जात आहे. त्यामुळे लवकरच जाहीर होणाऱ्या नव्या गटाकडे, गणाकडे आणि आरक्षणाकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणूका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले होते; मात्र जिल्हा बँक, कुडाळ नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसला मिळालेले यश पाहता काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार की स्वतंत्ररित्या उमेदवार देणार याचे चित्र येत्या काळात स्पष्ट होणार आहे. राणे काँग्रेसमध्ये असताना तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व होते; मात्र आता राणे भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी मोठी कंबर कसावी लागेल. एकंदरीत पाहता तालुक्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातच सत्तेसाठी चढाओढ पहायला मिळणार आहे.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने आलेल्या आमदार नीतेश राणे यांनी या भागाच्या विकासासाठी आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत आमदार म्हणून नीलेश राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे यादृष्टीकोनातून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदार संघावर भाजपचे वर्चस्व राखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. सद्यःस्थितीत भाजपकडून नव्या गटाची, गणाची आणि आरक्षण काय पडते ? या घडामोडींवर लक्ष केंद्रीत केले आहे.
Web Title: Zilla Parishad Panchayat Samiti Elections Malvan Bjp Narayan Rane Shiv Sena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..