
चिपळूण : शहरात पाणी भरणाऱ्या संभाव्य भागात पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बैठका सुरू झाल्या आहेत. महापुराला तोंड देण्यासाठी पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, नागरिकांनी काय केले पाहिजे, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांच्या दारात जाऊन दिली जात आहे. पावसाळ्यात पुन्हा महापुरासारखी स्थिती निर्माण झाली तर त्यात पालिका कोठे कमी पडली नाही, हे सामान्य नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचे काम पालिकेकडून केले जात आहे. त्यामुळे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचा हा प्रयत्न म्हणजे शहरासाठी आशेचा किरणच म्हणावा लागेल.
गेल्या वर्षी झालेल्या पुराच्या थैमानानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे. महापुराला तोंड देण्यासाठी पालिकेची जय्यत तयारी सुरू आहे. नागरिकांना महापूर नवीन नाही. पालिकाही दरवर्षीच संभाव्य पुराच्या उपाययोजना संबंधीची तयारी करत असते; मात्र त्यात सामान्य नागरिकांचा सहभाग किती असतो, हा खरंतर प्रश्नच. गेल्या वर्षी आलेल्या महापुराने संपूर्ण शहर उद्ध्वस्त केले. त्यात पालिकेचे कर्मचारी व अधिकारीही भरडले गेले;परंतु सर्वाधिक टीका पालिकेवर झाली. यावर्षी तसे होऊ नये, यासाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांमध्ये जागृती सुरू केली आहे.
नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्ऩ
महापूर टाळणे पालिकेच्या हातात नाही; परंतु कमीत कमी नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आटापिटा सुरू आहे. पालिकेच्या या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि या प्रयत्नांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या
बैठका सुरू आहेत.
...या भागात सुरू आहेत बैठका
पेठमाप, मुरादपूर, शंकरवाडी, खाटीकआळी, बेंदरकरआळी, वडनाका, देसाई मोहल्ला, भेंडीनाका, बाजारपेठ, गोवळकोट रोड परिसर.
तातडीची मदत कशी मागता येईल?
पाऊस लांबल्यामुळे पालिकेला तयारीसाठी आणखी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे आदींचे पथक तयार केले आहे. हे अधिकारी आपल्या सहकाऱ्यांबरोबर पाणी भरणाऱ्या संभाव्य भागात जाऊन नागरिकांच्या बैठका घेत आहेत. पुराचा सामना करण्यासाठी पालिकेने कोणती तयारी केली आहे, नागरिकांनी काय केले पाहिजे, तातडीची मदत कशी व कुणाकडे मागता येईल, याची परिपूर्ण माहिती दिली जात आहे.
एक नजर...
गेल्या वर्षी घातले होते पुराने थैमान
गतवर्षीच्या महापुराने संपूर्ण शहर उद्ध्वस्त
पालिकेचे कर्मचारी, अधिकारीही भरडले गेले
आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित
महापुराला तोंड देण्यासाठी पालिकेची जय्यत तयारी
पाऊस लांबला; तयारीसाठी आणखी कालावधी मिळाला
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपत्तीनंतर लोकांची किती दैना उडते, हे गेल्या वर्षीच्या महापुराने शिकवले. आपण मागच्या आपत्तींमधून काही धडा घेणार का, हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. मागील सहा महिन्यांपासून अहोरात्र तयारी सुरू आहे. पूर थांबवणे कुणाच्याही हातात नाही; मात्र उपाययोजना करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.
- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका
संकटकाळात वापरता येतील, अशी सुरक्षा उपकरणे तर लहान मुलेही तयार करू शकतात. महापुराचा सामना करताना शहराची एकूण परिस्थिती हाताळणे आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. दरड कोसळली किंवा पाणी भरल्यानंतर काय केले पाहिजे, याबाबत शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांतही प्रबोधन व्हायला हवे.
- विलास कांबळे, जागरूक नागरिक, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.