अर्जेंटिनाची चिलीविरुद्ध आज महत्त्वपूर्ण लढत

पीटीआय
Thursday, 23 March 2017

ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना),-अर्जेंटिना आणि मेस्सीशिवाय विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा ही कल्पनाच कुणी करू शकणार नाही. पण, ही वेळ आली आहे. अर्जेंटिनाचा रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील सहभाग उद्या गुरुवारी त्यांच्या घरच्या मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी चिलीविरुद्ध होणाऱ्या लढतीवर अवलंबून असेल.

ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना),-अर्जेंटिना आणि मेस्सीशिवाय विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा ही कल्पनाच कुणी करू शकणार नाही. पण, ही वेळ आली आहे. अर्जेंटिनाचा रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील सहभाग उद्या गुरुवारी त्यांच्या घरच्या मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी चिलीविरुद्ध होणाऱ्या लढतीवर अवलंबून असेल.

विश्‍वकरंडक पात्रता फेरीत व्हेनेझुएला आणि पेरुविरुद्धच्या दोन अनिर्णित लढती तसेच पॅराग्वे आणि ब्राझीलविरुद्ध स्वीकारावे लागलेल्या पराभवामुळे अर्जेंटिनाचा रशियात खेळण्याचा मार्ग कठिण झाला आहे. त्यानंतर कोलंबियावर ३-० असा विजय मिळवून त्यांनी आपले आव्हान कायम राखले होते. दक्षिण अमेरिका विभागातून पहिले पाच क्रमांक थेट विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरणार आहेत. पण, अर्जेंटिना संघ अजून पाचव्या क्रमांकापर्यंतही पोचलेला नाही. त्यांचे १२ सामन्यांतून १९ गुण झाले आहे. 

अशा स्थितीत अर्जेंटिनाचा या लढतीत चिलीविरुद्ध पराभव झाल्यास त्यांचा पाय अधिक खोलात जाणार आहे. त्याचबरोबर कोलंबियाने दुबळ्या बोलिवियाविरुद्ध विजय मिळविल्यास अर्जेंटिनाला विश्‍वकरंडक सहभागासाठी प्ले-ऑफ लढतीचा आधार घ्यावा लागेल. 

अर्जेंटिनाने ही लढत जिंकल्यास पुढील आठवड्यात त्यांची लढत बोलिवियाशी होईल, तेव्हा त्यांचे पारडे जड राहील. पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत अर्जेंटिनाने चिलीवर २-१ असा विजय मिळविला आहे. पण, त्यानंतर चिलीने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनावर विजय मिळविला आहे. 

दरम्यान, याच विभागात उद्याच माँटेव्हिडियो येथे ब्राझील विरुद्ध उरुग्वे हा आणखी एक सामना होणार आहे. कोपा अमेरिकन स्पर्धेतील अपयशानंतरही नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीनंतर ब्राझीलने पात्रता फेरीत सलग सहा विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली आहे. पात्रता फेरीत ब्राझील आणि उरुग्वे हे दोन्ही संघ गुणतक्‍त्यात पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्राझीलने उरुग्वेवर चार गुणांची आघाडी घेतली आहे. या आघाडीवर असणाऱ्या दोन संघांतील लढतीत ब्राझीलने विजय मिळविल्यास सलग सातव्या विजयासह त्यांचा रशियात खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argentina match today against Chile