esakal | युरोपियन बेल्जियम ठरणार ब्राझीलसाठी डोकेदुखी? 
sakal

बोलून बातमी शोधा

belgium creat tension for Brazil?

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असूनही बेल्जियमला कोणीही फुटबॉलमधील ताकद मानत नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला पराजित केले तर बेल्जियम फुटबॉलचा दबदबा वाढेल तसेच आपलीही किंमत वाढेल, याची जाणीव बेल्जियम खेळाडूंना आहे. 

युरोपियन बेल्जियम ठरणार ब्राझीलसाठी डोकेदुखी? 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कझान - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असूनही बेल्जियमला कोणीही फुटबॉलमधील ताकद मानत नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला पराजित केले तर बेल्जियम फुटबॉलचा दबदबा वाढेल तसेच आपलीही किंमत वाढेल, याची जाणीव बेल्जियम खेळाडूंना आहे. 

बेल्जियमचे चाहते आपल्या संघास प्रेमाने गोल्डन जनरेशन म्हणतात. पण बेल्जियम खेळाडूंना ते मान्य नाही. आम्हाला गोल्डन जनरेशन म्हणणे चुकीचे आहे. ही लढत आमच्यासाठी खूपच मोलाची आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा नक्कीच कमी नाही, पण ते आता दाखवण्याची आम्हाला संधी आहे, असे बेल्जियमचा अव्वल बचावपटू व्हिन्सेंट कोम्पनी याने सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून बेल्जियमला स्पर्धा विजेतेपदासाठी पसंती दिली जाते, पण त्यांना लौकिकानुसार कामगिरी साधलेली नाही. गेल्या दोन महत्त्वाच्या स्पर्धेत त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत आटोपले होते. क्‍लब स्तरावर प्रभावी ठरणारे बेल्जियम खेळाडू राष्ट्रीय संघाला यश देत नाहीत. 

ताकदवान संघ असला की लढतीपूर्वीच आम्ही हरणार असे समजत होतो, पण आता मनःस्थिती बदलली आहे. आपण ब्राझीलला हरवू शकतो याची आम्हाला खात्री आहे, पण त्याचवेळी आपण हरलो तर याचीही धास्ती आम्हाला आहे. भविष्यात आम्हाला हे नक्कीच नको आहे, असेही त्याने सांगितले. 

बेल्जियमच्या खेळाडूंना आपण वैयक्तिक कौशल्यात ब्राझील खेळाडूंच्या तुलनेत कमी आहोत, याची जाणीव आहे; पण त्याचवेळी आपले सांघिक कौशल्य ब्राझीलपेक्षा सरस आहे, हा त्यांचा विश्‍वास आहे. हीच ब्राझीलसाठी जास्त डोकेदुखी आहे. 

आम्ही वैयक्तिक कौशल्यात नव्हे, तर सांघिक कामगिरीत ब्राझीलपेक्षा सरस आहोत. एकमेकांसह तसेच एकमेकांसाठी कसे लढायचे याची आम्हाला पुरेपूर कल्पना आहे. त्यात आम्ही नक्कीच स्मार्ट आहोत. फुटबॉलमध्ये वैयक्तिक नव्हे, तर सांघिक कौशल्य महत्त्वाचे असते. - व्हिन्सेंट कोम्पनी, बेल्जियमचा अनुभवी खेळाडू