esakal | ब्राझीलचा मेक्सिकोवर 2-0 ने विजय; नेमार हिरो
sakal

बोलून बातमी शोधा

Brazil

ब्राझीलचा मेक्सिकोवर 2-0 ने विजय; नेमार हिरो

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सामारा : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचे आपण आता सर्वांत प्रबळ दावेदार आहोत, याची झलक ब्राझीलने पेश केली. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो स्पर्धेतून बाद झाले असले, तरी आपण स्पर्धेत आहोत, हे दाखवताना नेमारने ब्राझीलच्या दोनही गोलात मोलाचा वाटा उचलला. 

ब्राझीलने मेक्‍सिकोवर सलग सातव्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीत बाद होण्याची वेळ आणली. पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर मेक्‍सिको जास्त चिवट खेळ करीत होते; पण त्यांचा बचाव नेमारने भेदला. साखळीत लौकिकास साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरलेल्या नेमारने झेपावत चेंडूला अचूक दिशा दिली आणि त्यानंतर रॉबर्टो फिर्मिनो याला अचूक पास दिला. त्यामुळे ब्राझीलने जिगरी मेक्‍सिकोचे आव्हान 2-0 असे परतवले. गतविजेत्या जर्मनीला हरवून विश्वकरंडकाची मोहीम सुरू केलेल्या मेक्‍सिकोला पाचदा विजेतेपद जिंकलेल्या ब्राझीलला रोखण्यात अपयश आले. 

मेक्‍सिकोला कमी लेखण्यास ब्राझील कधीच तयार नव्हते. दोघांतील गेल्या पंधरापैकी सात लढती मेक्‍सिकोने जिंकल्या होत्या. पूर्वार्धाच्या सुरवातीस मेक्‍सिकोने वेगवान प्रतिआक्रमणे करीत ब्राझीलला दडपणाखाली ठेवले होते. त्यातच नेमार संधी दवडत असल्याने मेक्‍सिकोचा आत्मविश्वास वाढतच होता. ब्राझीलच्या या स्टार खेळाडूस चेंडूवर नीट ताबाही ठेवता येत नव्हता. 

उत्तरार्धात नेमारने कात टाकली तशीच ब्राझीलनेही. त्याने केलेल्या गोलची चालही नेमारनेच रचण्यास सुरवात केली होती. त्याने गोलक्षेत्रात अप्रतिम बॅकपास देत ब्राझीलची आगळी चाल सुरू केली. विलियनच्या प्रभावी क्रॉस सत्कारणी लावताना नेमारने झेपावत चेंडू जाळ्यात मारला होता. या गोलने मेक्‍सिको खच्ची झाले. त्यांनी आक्रमणाचा वेग वाढवत ब्राझीलला प्रसंगी बचावात्मक खेळ करण्यासही भाग पाडले. मेक्‍सिको गोलच्या संधी निर्माण करीत होते; पण गोल केला तो ब्राझीलनेच. नेमारचीच चाल निर्णायक ठरली. आता त्यांची लढत बेल्जियम अथवा जपानविरुद्ध होईल. 

- नेमारचा सहावा विश्वकरंडक गोल; रॉबर्टो रिवेलिनो, बेबेटोच्या कामगिरीशी बरोबरी 
- सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत ब्राझीलने (228) जर्मनीस मागे टाकले 
- मेक्‍सिकोचा रॅफेल मार्क्वेझ (39 वर्षे 139 दिवस) बाद फेरीची लढत खेळलेला सर्वांत बुजुर्ग खेळाडू 
- या स्पर्धेत या लढतीपूर्वी उत्तरार्धात 82 गोल, तर गतस्पर्धेत 54 
- या स्पर्धेत पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी असलेली विसावी लढत 
- मेक्‍सिको गेल्या सातव्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीत पराजित, तर ब्राझील सलग सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत 
- ब्राझील सलग 16 सामन्यांत अपराजित 

अशी झाली लढत 
ब्राझील मेक्‍सिको 

2 गोल 0 
21 शॉट्‌स 13 
10 ऑन टार्गेट 1 
8 कॉर्नर्स 7 
0 ऑफसाईड 2 
46% चेंडूवर ताबा 54% 
329 यशस्वी पास 363 
92 किमी एकूण धाव 89 किमी 
2 यलो कार्डस 4 
6 फाउल्स 18