ब्राझीलची बरोबरीने सुरवात 

वृत्तसंस्था
Tuesday, 19 June 2018

सहाव्या विश्‍वविजेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या ब्राझीलला आपल्या मोहिमेची सुरवात मात्र बरोबरीने करावी लागली. सुरवातीपासून आक्रमक खेळ केल्यानंतरही ब्राझीलला स्वित्झर्लंडचा बचाव पूर्णपणे भेदण्यात अपयश आले. 

रोस्टोव - सहाव्या विश्‍वविजेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या ब्राझीलला आपल्या मोहिमेची सुरवात मात्र बरोबरीने करावी लागली. सुरवातीपासून आक्रमक खेळ केल्यानंतरही ब्राझीलला स्वित्झर्लंडचा बचाव पूर्णपणे भेदण्यात अपयश आले. 

गतविजेत्या जर्मनीच्या सनसनाटी पराभवानंतर झालेल्या या सामन्यात ब्राझीलने संथ सुरवात केली. गोल करण्याची संधी निर्माण करण्यापेक्षा ती चालून येण्याची वाट पाहणे ब्राझीलला महागात पडले. पूर्वार्धात कुटिन्होने केलेला असाच एक गोल ब्राझीलला आघाडीवर घेऊन गेला. मात्र, उत्तरार्धात लौकिकाप्रमाणे बचावात दाखवलेला विस्कळितपणा आणि झुबेरकडे दुर्लक्ष करण्याच्या चुकीमुळे त्यांना गोल स्वीकारावा लागला. पेनल्टी कॉर्नरवर आलेल्या खोलवर किकवर हेडर करणे झुबेरला काहीच कठीण गेले नाही. या बरोबरीमुळे ब्राझीलला आता शुक्रवारी (ता. 22) कोस्टारिकाविरुद्ध नव्या नियोजनाने सुरवात करावी लागेल. 

कुटिन्होचा गोल ब्राझीलवरील दडपण कमी करणारा ठरणार असला, तरी नेमारचा सुरू असलेला "बॅडपॅच' त्यांना नक्कीच सलत असेल. दुखापतीमुळे अपुरा सराव होऊनसुद्धा नेमार त्यांच्या शैलीत खेळला. स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी त्याला सातत्याने "लक्ष्य' केले. मात्र, त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागले. नेमारला अडथळा आणताना अवैध पद्धत अवलंबणाऱ्या त्यांच्या लिश्‍चेनेर, शार आणि बेहरामी यांना यलो कार्ड सहन करावे लागले. 

नेहमीप्रमाणे आक्रमणाला ते बचावाची साथ देऊ शकले नाहीत. त्याहीपेक्षा त्यांचे खेळाडू एकत्रित खेळ दाखवू शकले नाहीत. नेमार आणि फिरमिनो यांचे अखेरच्या मिनिटातील प्रयत्न जबरदस्त होते. पण, त्यांचे फटके थेट गोलरक्षकाच्या हातीच गेले. त्यामुळे अखेरीस त्यांना स्वित्झर्लंडविरुद्ध एक गुण वाटून घ्यावा लागला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazil failed to win their opening game of a World Cup for the first time