esakal | चेल्सीची युनायटेडविरुद्ध हार; जेतेपदासाठी चुरस
sakal

बोलून बातमी शोधा

चेल्सीची युनायटेडविरुद्ध हार; जेतेपदासाठी चुरस

चेल्सीची युनायटेडविरुद्ध हार; जेतेपदासाठी चुरस

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - मॅंचेस्टर युनायटेडने चेल्सीचा पराभव करून प्रीमियर लीगमधील रंगत वाढवली. वेगाने प्रगती करीत असलेल्या टॉटनहॅम हॉटस्‌पूर आघाडीपासून दूर ठेवण्याचे आव्हान चेल्सीसमोर उर्वरित सहा सामन्यांत असेल.

युनायटेडला कमी लेखण्याची चूक चेल्सीला भोवली. मार्कस्‌ रॅशफोर्ड आणि ॲदेर हेरेरा यांच्या गोलमुळे युनायटेडने चेल्सीला २-० असे हरवले. चेल्सीची चार सामन्यांतील ही दुसरी हार. त्यामुळे त्यांची आघाडी चार गुणांपर्यंतच आली आहे. 

टॉटनहॅमने चेल्सीची आघाडी कमी करताना बाऊरनेमाऊथला यापूर्वीच ४-० असे हरवले होते. लिव्हरपूलने (६६) वेस्ट ब्रामविच ॲल्बियनला १-० हरवून पुन्हा तिसरा क्रमांक मिळविला. मॅंचेस्टर सिटी (६४) चौथ्या; तर युनायटेड (६०) पाचव्या क्रमांकावर आहे. युनायटेड पाचवा असला तरी तो आघाडीवरील चार संघांपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. 

युनायटेडसाठी हा विजय मोलाचा होता. गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये जोस मॉरिन्हो यांनी संघाची सूत्रे घेतल्यानंतर काही दिवसांतच युनायटेड चेल्सीविरुद्ध ०-४ पराजित झाला होता. त्यातच गेल्या महिन्यात एफए कप स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत चेल्सीने युनायटेडचा पाडाव केला होता. या पार्श्वभूमीवर युनायटेडसाठी हा विजय मोलाचा आहे. युनायटेड लीगमधील २२ सामन्यांत अपराजित आहेत.

लिव्हरपूलचा खेळ बहरला नाही; पण सामन्यातील निर्णायक गोल करण्यात तो यशस्वी ठरला. तो फेब्रुवारीच्या सुरवातीस लिस्टरविरुद्ध हरल्यानंतर अपराजित आहे. या लीगमधील चार संघ चॅंपियन्स लीगसाठी पात्र ठरतात. युनायटेड, आर्सेनल, एव्हर्टन या पाच ते सात क्रमांकांवरील संघांना पहिल्या चार संघांत येण्याची संधी आहे. त्यातील आर्सेनल आघाडीवरील चार संघांपेक्षा तीन लढती कमी खेळले आहेत.