फुटबॉल स्टार रोनाल्डो जुलैमध्ये मुंबईत? 

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

भारतात लवकरात लवकर जाण्यास मी उत्सुक आहे. 
- रोनाल्डो इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स झाल्यानंतर

मुंबई : जगातील अब्जावधी फुटबॉल शौकिनांचा लाडका असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो जुलैमध्ये मुंबईत येण्याची शक्‍यता आहे. विश्‍वकरंडक 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ जुलैत मुंबईत काढण्यात येणार आहे, त्यासाठी रोनाल्डोला निमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

ड्रॉसाठी रोनाल्डोने यावे, यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात महासंघाचे पदाधिकारी पोर्तुगाल फुटबॉल महासंघ, तसेच रोनाल्डोच्या एजंटबरोबर चर्चा करीत आहेत. त्याचा कार्यक्रम निश्‍चित नसेल तर तो येऊ शकेल, असे सांगण्यात आल्याचे भारतीय फुटबॉल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

रोनाल्डोचा रेयाल माद्रिदबरोबरील या मोसमाचा करार 4 जूनपर्यंत आहे. त्या कराराचा प्रश्‍न येणार नाही. चॅंपियन्स लीगची अंतिम लढत 21 मे या दिवशी आहे. त्यानंतर 17 जून ते 2 जुलैदरम्यान होणाऱ्या कॉन्फेडरेशन फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डो पोर्तुगालचे नेतृत्व करणार आहे. 

Web Title: cristiano ronaldo likely to land in Mumbai this July