इंग्लंडचे ब्रेक्‍झिट; क्रोएशिया अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था
Thursday, 12 July 2018

नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर अतिरिक्त वेळेतील पूर्वार्धातही बरोबरीची कोंडी सुटू शकली नव्हती. अर्थात, क्रोएशियाच्या पेरिसीच आणि मॅंडझुकीच यांनी केलेले प्रयत्न इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये धडकी भरवणारे ठरत होते. सामन्याचा पहिला घाव इंग्लंडने पाचव्या मिनिटाला घातला, मात्र अखेरचा घाव अतिरिक्त वेळेच्या 109व्या मिनिटाला मॅंडझुकीचने घातला आणि क्रोएशियाचा अंतिम फेरीत नेले. 

मॉस्को : क्रोएशियाने आपल्या जबरदस्त मैदानी खेळाच्या जोरावर इतिहास घडवला. इंग्लंडचे तगडे आव्हान बुधवारी दुसऱ्या उपांत्य लढतीत अतिरिक्त वेळेत 2-1 असे मोडून काढत त्यांनी प्रथमच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सामन्याच्या आणि अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात गोल करणारे पेरिसीच आणि मॅंडझुकीच क्रोएशियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 

नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर अतिरिक्त वेळेतील पूर्वार्धातही बरोबरीची कोंडी सुटू शकली नव्हती. अर्थात, क्रोएशियाच्या पेरिसीच आणि मॅंडझुकीच यांनी केलेले प्रयत्न इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये धडकी भरवणारे ठरत होते. सामन्याचा पहिला घाव इंग्लंडने पाचव्या मिनिटाला घातला, मात्र अखेरचा घाव अतिरिक्त वेळेच्या 109व्या मिनिटाला मॅंडझुकीचने घातला आणि क्रोएशियाचा अंतिम फेरीत नेले. 

उत्तरार्धात इंग्लंडने विजयाची संधी शोधण्यापेक्षा बचावाकडे अधिक लक्ष दिले. त्याउलट क्रोएशियाने पिछाडीचे दडपण झुगारून आपले प्रयत्न सुरूच ठेवले. मात्र, त्यांच्या प्रयत्नात इंग्लंडचा बचावपटू वॉकरचा अडथळा कायम राहिला. मॉड्रिच आणि रॅकिटीच यांना अपयश येत असतानाच पेरिसीच क्रोएशियासाठी लढत होता. सामन्याच्या 68व्या मिनिटाला व्हर्साकोच्या खोलवर आलेल्या क्रॉसपासवर त्याने पायाने नुसता "टच' करण्याची दाखवलेल्या समयसूचकतेने क्रोएशियाला सामन्यात आणले. या गोलनंतर पुढच्याच मिनिटाला पेरिसीचचा असाच एक प्रयत्न चेंडू गोलपोस्टला चाटून बाहेर गेल्याने अपयशी ठरला. बरोबरीनंतर क्रोएशियाचा उंचावलेला आत्मविश्‍वास जबरदस्त होता; पण नियोजित वेळेत सामना निकाली होऊ शकला नाही. 

त्यापूर्वी, सामन्याच्या सुरवातीला गोल होऊ द्यायचे नाही, या क्रोएशियाच्या नियोजनाला छेद मिळाला. दोन्ही संघ अजून स्थिरावत नाहीत तो मिळालेल्या फ्री-किकचा फायदा इंग्लंडने उठवला. स्पर्धेत निर्णायक ठरलेल्या सेट पीसवर आणखी एक गोल नोंदला गेला. ट्रिप्पिएरने थेट किकवर क्रोएशियाच्या गोलरक्षक सुबासिचला संधीही दिली नाही. सुरवातीलाच झालेल्या या गोलने सामन्याचे चित्रच बदलले. इंग्लंडने अपेक्षितपणे बचावाला संधी दिली, तर क्रोएशिया दडपणाखाली खेळ उंचावू शकले नाहीत. चेंडूवर जरूर त्यांचा अधिक ताबा राहिला; पण गोलफलक त्यांच्या बाजूने नव्हता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Croatia beat England by 2-1 in Football World Cup FIFA