क्षणिक संतापामुळे 'तो' मुकला 'वर्ल्ड कप'च्या फायनलला!

वृत्तसंस्था
Saturday, 14 July 2018

फुटबॉल विश्वकरंडकात रविवारी (15 जुलै) होणाऱ्या क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी क्रोएशियाने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारल्याने त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जाईल. क्रोएशियाचा एक स्ट्रायकर मात्र या साऱ्या कौतुकास पारखा राहणार आहे.

मॉस्को : फुटबॉल विश्वकरंडकात रविवारी (15 जुलै) होणाऱ्या क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी क्रोएशियाने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारल्याने त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जाईल. क्रोएशियाचा एक स्ट्रायकर मात्र या साऱ्या कौतुकास पारखा राहणार आहे. निकोला कालिनिच असे त्या खेळाडूचे नाव आहे. पहिल्या सामन्यात राखीव खेळाडू म्हणून खेळण्यास नकार देण्याच्या त्याच्या निर्णयाचा त्याला आयुष्यभर पश्चाताप होणार आहे. 

फुटबॉल विश्वकरंडकाची अंतिम फेरीत गाठणाऱ्या  क्रोएशिया संघात फक्त दोन स्ट्रायकर होते. एक मॅंड्झुकीच आणि दुसरा म्हणजे निकोला कालिनिच. नायजेरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कालिनिचला संघात स्थान न मिळता राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागल्याने त्याची फार चिडचिड झाली. नायजेरियाविरुद्ध क्रोएशियाने 2-0 अशी आघाडी घेतल्यावर मार्गदर्शक झाल्को डॅलीच यांनी कालिनिचला मैदानात उतरण्यास सांगितले मात्र त्याने खेळण्यास नकार दिला. स्वत:ला उच्चदर्जाचा खेळाडू मानणाऱ्या कालिनिचला फक्त पाच मिनिटांसाठी मैदानात उतरणे अपमानकारक वाटले. मार्गदर्शक डॅलीच यांनी त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला मैदानात पाचारण केले. 

कालिनिचच्या या बेजबाबदार वागणूकीमुळे त्याला परत मायदेशी पाठवण्यात आले. गैरवर्तनामुळे विश्वकरंडकातून मायदेशी जावं लागणारा कालिनिच हा एकमेव खेळाडू आहे. विश्वकरंडकात क्रोएशिया संघ चांगली कामगिरी करु शकणार नाही असे मत त्याने व्यक्त केले होते, मात्र त्याच्या अनुपस्थितीतही क्रोएशियाने संघआने अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली आहे. क्रोएशिया संघातील बाकीचे 22 खेळाडू हे खरे 'हिरो' असून क्रोएशियाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरण्यात येईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Croatia vs France World Cup Final