क्रोएशिया यंदाच्या स्पर्धेचे ‘फाइंड’

ivan-perisic
ivan-perisic

यंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम, क्रोएशिया यांनी मात केली. यंदाची अंतिम फेरी फ्रान्स आणि क्रोएशिया या युरोपियन देशांमध्येच होत आहे. त्यातही क्रोएशियाचा संघ यंदाच्या स्पर्धेचे ‘फाइंड’ आहे. अनोख्या क्रोएशियाविषयी....

क्रोएशिया हा विश्‍वकरंडक फुटबॉलच्या निमित्तानेच जास्त चर्चेत असलेला देश. महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या जवळपास क्षेत्रफळ आणि मुंबईच्या जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या असलेला हा देश! काही वर्षांपर्यंत अंतर्गत यादवी युद्धाने होरपळलेला व अजूनही पूर्ण एकजिनसी झालेला नाही. क्रोएशियावासीयांना एकत्र आणते ते फुटबॉल. अगदी ब्राझीलमध्ये असते तसेच येथील वातावरण फुटबॉलला वाहिलेले. मूल चालू लागल्यावर त्याच्या पायाला फुटबॉल लागतो. असे म्हटले तर गैर ठरणार नाही. 

बाल्कन देशातील हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध. इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू, छान लोभसणारे समुद्र किनारे पर्यटकांना मोहात पाडतात. तेथील हॉटेल, रेस्टॉरंट, पबमध्ये तुम्ही फुटबॉलबाबत बोलायला सुरवात केली, की तुमचे त्यांच्याशी नाते घट्ट होते. हे फुटबॉल प्रेम रस्त्यावर सहज फेरफटका मारल्यावरही दिसते. चेक्‍सचा टी शर्ट घातलेली लहान मुले छोट्याशा जागेतही फुटबॉल कौशल्य आजमावताना दिसतात. 

क्रोएशियन्सच्या रक्तातच फुटबॉल आहे आणि ते कोणत्याही लीगला सूट होते. क्रोएशियात फुटबॉलचे धडे गिरवायचे आणि युरोपातील महागड्या लीगमध्ये खेळायचे, हेच येथील युवकांचे स्वप्न असते. क्रोएशियाच्या विश्‍वकरंडक संघातील सर्वच खेळाडू जगभरातील लीगमध्ये कुठे ना कुठे खेळत असतात. ते परिस्थितीनुसार खेळ बदलतात, तसेच प्रतिकूल परिस्थितीतही लढत राहतात. मात्र, याच भिन्नतेमधील संघर्षही उफाळून येतो. योग्य मार्गदर्शक नसल्यास क्रोएशिया कुठल्या कुठे फेकले जातील. सध्याचे मार्गदर्शक झ्लाटको डॅलिच यांनी संघाची मोट चांगली बांधली. प्रतिकूल परिस्थितीत देवाची भक्तीच मार्ग दाखवते, यावर त्यांचा विश्‍वास आहे. आपल्या चुका खेळाडूंसमोर मान्य करण्याची त्यांची तयारीही संघाला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करते. 

काळी किनार
एखादे यश ओसंडून वाहत असले, की त्याला काळी किनार ही आलीच. क्रोएशियाचे अगदी तसेच आहे. येथील फुटबॉल प्रशासन भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे. त्यांच्या अनेक लढतींच्या वेळी चाहते याचा निषेध करतात. संघटनेला अडचणीत आणणाऱ्या गोष्टी करतात. त्यामुळे जागतिक व युरो फुटबॉल संघटनेकडून क्रोएशियाला वारंवार दंड होतो. क्रोएशिया साखळीत बाद झाले, तर चांगले होईल, अशी जाहीर प्रार्थना केली जात होती. स्प्लिट हे क्रोएशियातील समुद्रकिनारी असलेले प्रमुख शहर, पर्यटनासाठी प्रसिद्ध. तिथे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक महिना आधी ‘तुमच्या प्रत्येक पराभवामुळे आम्हाला आनंद होतो. तुमची सर्वांत खराब कामगिरी होवो!’ या अर्थाचा एक फलक झळकला होता. 

क्रोएशियात फुटबॉल हा केवळ खेळ नाही. त्याला समाजमनात मोठे स्थान आहे. भारतात क्रिकेट आहे, त्यापेक्षाही कितीतरी जास्त. त्यामुळेच विश्‍वकरंडक पात्रता मोहिमेत संघाला विजय हवा असताना, लढत पावसामुळे रद्द होण्याची शक्‍यता आहे हे दिसत असतानाही त्याचे दडपण खेळाडूंवर दिसत नसल्याची छायाचित्रे पाहून क्रोएशियात संतापाची लाट उसळली होती. नवे मार्गदर्शक डॅलिच यांनी परिस्थिती बदलली. क्रोएशियातील नामवंत फुटबॉल अभ्यासक अलेक्‍झांडर होलिगा यांनी ‘द ऑब्झर्व्हर’मध्ये क्रोएशिया संघाचे अपयशच संघटनेत बदल घडवून आणेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळेच क्रोएशियाने आज विश्‍वकरंडक उंचावला नाही, तरी ते त्यांच्यासाठी मोठेच यश आहे. विजेतेपद मिळाल्यास मात्र क्रोएशियातील फुटबॉल भरारी घेण्यापेक्षा आहे तिथेच राहील, असे मानले जाते.

असा आहे क्रोएशिया
ऑस्ट्रिया-हंगेरीच्या वर्चस्वातून मुक्त झालेल्या सर्बिया, क्रोएशिया आणि स्लोवेनियाने १९१८मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि युगोस्लाव्हियाची १९२९मध्ये स्थापना झाली. मात्र, दहा वर्षांतच क्रोएशियाला आर्थिक स्वायत्तता देण्याचा निर्णय झाला. पहिल्या महायुद्धामुळे पुन्हा युगोस्लाव्हियाच्या ध्वजाखाली एकत्रीकरण झाले. हे करण्यात मोलाची कामगिरी बजावलेले टीटो यांचे १९८०मध्ये निधन झाले आणि वाद सुरू झाले. क्रोएशियाने १९९१मध्ये स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली, पण संघर्ष कायम राहिला. त्यांचे एकाचवेळी सर्बिया तसेच बोस्निया-हेर्झेगोविनाबरोबर युद्ध सुरू होते. संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळण्यास सुरवात झाली. अखेर या शतकाच्या सुरवातीपासून सर्व काही शांत झाले. मध्य आणि दक्षिण पूर्व युरोपच्या मध्यभागी असलेल्या या देशाच्या एका बाजूस आद्रिएटीक समुद्र आहे. या समुद्राच्या दुसऱ्या बाजूला इटली आहे. स्लोवेनिया, हंगेरी, सर्बिया आणि बोस्निया- हेर्झेगोविना या देशांच्या सीमा या देशाला भिडतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com