डेन्मार्कच्या बचावाची क्रोएशियाला धास्ती

वृत्तसंस्था
Sunday, 1 July 2018

लिओनेल मेस्सीला रोखत अर्जेंटिनाला चारी मुंड्या चीत करून बाद फेरी थाटात गाठणाऱ्या क्रोएशियासमोर उद्या डेन्मार्कचे आव्हान आहे. पारडे क्रोएशियाच्या बाजूने झुकलेले असले तरी क्रोएशियाच्या इवान रॅकेटिकचे स्वप्न डेन्मार्कचा ख्रिस्तियन एरिक्‍सन भंग करण्याच्या तयारीत आहे. 
 

निझनी नोवगोरोड (रशिया) - लिओनेल मेस्सीला रोखत अर्जेंटिनाला चारी मुंड्या चीत करून बाद फेरी थाटात गाठणाऱ्या क्रोएशियासमोर उद्या डेन्मार्कचे आव्हान आहे. पारडे क्रोएशियाच्या बाजूने झुकलेले असले तरी क्रोएशियाच्या इवान रॅकेटिकचे स्वप्न डेन्मार्कचा ख्रिस्तियन एरिक्‍सन भंग करण्याच्या तयारीत आहे. 

क्रोएशियाने अर्जेंटिनासह नायजेरिया आणि आइसलॅंडला हरवून "ड' गटात पहिले स्थान मिळवले होते. तर डेन्मार्कने "क' गटात फ्रान्सनंतर दुसरा क्रमांक मिळविला. डेन्मार्कची वाटचाल आम्ही बारकाईने पाहिली आहे, असे रॅकेटिक म्हणतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अतिशय बचावात्मक खेळ करून साधलेल्या बरोबरीमुळे डेन्मार्कबाबत क्रोएशियाही सावध झाले आहेत. रॅकेटिकवर क्रोएशियाची भिस्त असली तरी लुका मॉड्रिक हा त्यांचा हुकमी खेळाडू आहे. 

त्यांचा संघ समतोल आहे आणि प्रतिस्पर्ध्यांना कसे रोखायचे याचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्याचवेळी ते प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्याच्या काही संधीही देतात, परंतु त्यांचा संघ एकूणच धोकादायक आहे. ख्रिस्तियन एरिक्‍सन हा युरोप आणि जागतिक स्पर्धेतील एक हुशार प्लेमेकर आहे, हे लक्षात घ्यावे लागेल, असे रॅकेटिकने सांगितले. 

रशियात आल्यानंतर डेन्मार्कला पेरूविरुद्धचा 1-0 असा एकमेव विजय मिळालेला आहे; परंतु त्यांनी एकच गोल स्वीकारला आहे, हे महत्त्वाचे आहे. क्रोएशियाचा बचाव भेदण्यासाठी एरिक्‍सन आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करेल, असे डेन्मार्कचा बचाव खेळाडू थॉमस डेलान्लेने सांगितले. 

फ्रान्सला गोनशून्य बरोबरीत रोखल्यामुळे डेन्मार्कच्या बचावफळीचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. फ्रान्सविरुद्ध आम्ही फार समतोल साधला नाही, परंतु योजनाबद्ध खेळ केला. त्यामुळे ख्रिस्तिनला त्याची आक्रमकता दाखविण्याची संधी मिळाली नाही. उद्याच्या सामन्यात तो मोकळेपणाने खेळू शकेल, असे डेलान्ले म्हणतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Denmark's defense against Croatia