अखेरचा जुगार जपानला भोवला 

वृत्तसंस्था
Wednesday, 4 July 2018

विश्‍वकरंडक स्पर्धा काही महिन्यांवर असताना जपानने अकिरो निशिनो यांच्याकडे संघाची सूत्रे सोपवण्याचा जुगार खेळला आणि निशिनो यांनी सातत्याने आपले नशीब आजमावत संघाची वाटचाल कायम ठेवली; पण अखेर भरपाई वेळेत पूर्ण आक्रमण करण्याची खेळी जपानला भोवली. 

सामारा - विश्‍वकरंडक स्पर्धा काही महिन्यांवर असताना जपानने अकिरो निशिनो यांच्याकडे संघाची सूत्रे सोपवण्याचा जुगार खेळला आणि निशिनो यांनी सातत्याने आपले नशीब आजमावत संघाची वाटचाल कायम ठेवली; पण अखेर भरपाई वेळेत पूर्ण आक्रमण करण्याची खेळी जपानला भोवली. 

जपानची खडतर पात्रता मोहीम यशस्वी करणाऱ्या 63 वर्षीय वाहीद हालिहॉद्‌झाक यांना जपानने स्पर्धेपूर्वी दोन महिने नारळ दिला आणि निशिनो यांच्याकडे जबाबदारी सोपवली. हालिहॉद्‌झाक यांनी बुजुर्गांऐवजी नवोदितांवर भर दिला होता; पण निशिनो यांनी याच बुजुर्गांना पसंती दिली. 

स्पर्धा सुरू झाल्यावरही निशिनो धोकादायक चाली खेळत होते. कोलंबियास हरवून जपानने छान सुरवात केली, तर सेनेगलला बरोबरीत रोखत बाद फेरीच्या दिशेने पाऊल टाकले. पण, शांत बसतील तर निशिनो कसले. त्यांनी पोलंडविरुद्धच्या अखेरच्या लढतीसाठी संघात सहा बदल केले. ते येथेच थांबले नाहीत, तर पीछाडीवर पडल्यावर बरोबरीसाठी प्रयत्न न करता 0-1 निकाल कायम राहील यास पसंती दिली. सेनेगलपेक्षा आपण फेअरप्लेमध्ये सरस असल्याचे जाणून त्यांनी ही चाल खेळली. 

बेल्जियमविरुद्धच्या लढतीसाठी प्रमुख खेळाडूंना पसंती दिली. त्याचबरोबर सूत्रे स्वीकारली त्या वेळी आक्रमण हेच धोरण असेल, याची आठवण त्यांना झाली. लढतीच्या सुरवातीस जपानला याचा फायदा झाला. त्यांनी 2-0 आघाडी घेतली. भरपाई वेळेत त्यांनी बरोबरी कायम राखत संधीची प्रतीक्षा करण्याऐवजी आक्रमणाचा आदेश दिला. बेल्जियमने प्रतिआक्रमणात जपानच्या बचावफळीच्या मर्यादा दाखवत बाजी मारली. 

दोष खेळाडूंचा नाही, मला खेळावर योग्य नियंत्रण राखता आले नाही. जेव्हा गोल स्वीकारला जातो, त्या वेळी मी मला दोष देतो. माझ्या व्यूहरचनेबाबत शंका घेतो. या पराभवाने मी खूपच निराश झालो आहे, असे निशिनो यांनी सांगितले. दोन गोलची आघाडी असताना आम्ही अजून एक गोल करावा अशी माझी इच्छा होती. या संधीही लाभल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIFA World Cup 2018 Japan teams match