कोलंबियाचा विजय सॅंचेझला समर्पित पोलंडवरील विजयाने राखले स्पर्धेतील आव्हान

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाने "ह' गटातील सामन्यात तुल्यबळ पोलंडचा 3-0 असा पराभव करून आव्हान राखले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण विजयाला सहकाऱ्याच्या काळजीची किनारदेखील होती. 

कझान - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाने "ह' गटातील सामन्यात तुल्यबळ पोलंडचा 3-0 असा पराभव करून आव्हान राखले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण विजयाला सहकाऱ्याच्या काळजीची किनारदेखील होती. 

जपानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या सुरवातीलाच रेड कार्ड मिळालेल्या कार्लोस सॅंचेझला नंतर देशातील जीवे मारण्याच्या धमक्‍या आल्या होत्या. सॅंचेझ या सामन्यात खेळू शकणार नव्हता. त्यानंतरही पोलंडवर सफाईदार विजय मिळविल्यानंतर कोलंबियाचे प्रशिक्षक जोस पीकरमन आणि खेळाडू भावनाविवश झाले होते. कोलंबियायाचा माजी स्टार खेळाडू वाल्डरामा याच्या उपस्थितीत त्यांनी हा विजय सॅंचेझला समर्पित केला. 

या विजयामुळे कोलंबियाचे आव्हान कायम असून त्यांची अखेरची लढत गुरुवारी (ता. 28) सेनेगलविरुद्ध होणार आहे. या लढतीसाठी आता सॅंचेझ उपलब्ध असेल याचे समाधानही कोलंबियाला या विजयाने लाभले. 

रॉड्रिगेज, फाल्काओ चमकले 
गेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सहा गोल करणारा जेम्स रॉड्रिगेज आणि कर्णधार राडमेल फाल्काओ कोलंबियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मिनाने पूर्वार्धात खाते उघडल्यावर फाल्काओ आणि कुलाड्राडो यांच्या गोलमुळे कोलंबियाने पोलंडचा पराभव केला. रॉड्रिगेजला गोल करण्यात अपयश आले असले, तरी दोन गोलसाठी त्याने केलेली चाल महत्त्वाची ठरली. 

धारदार आक्रमणाला कोलंबियाच्या बचावफळीची भक्कम साथ दिली. त्यामुळे पोलंडच्या रेवांडोवस्की या प्रमुख खेळाडूला लयच मिळवता आली नाही. पोलंडच्या आक्रमकांना आलेले अपयश त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. त्याचवेळी कोलंबियाच्या आक्रमकांनी पोलंडचा बचाव खिळखिळा करून त्यांच्यावर टाकलेल्या दडपणाचा फायदा घेतला.

आठवणीनेच शहारून येते 
1994च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध स्वयंगोल करणाऱ्या कोलंबियाच्या एस्कोबारचा मायदेशात परतल्यावर खून करण्यात आला होता. या वेली केवळ रेड कार्ड मिळाल्यावर सॅंचेझला आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे सगळेच धास्तावून गेले होते. 1994च्या घटनेने आजही अंग शहारून उठते. त्यामुळेच आमचे खेळाडू जीव तोडून खेळले. देशासाठी आणि सहकाऱ्यासाठी. खरंच, मला या खेळाडूंचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रियाही प्रशिक्षक पीकरमन यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIFA World Cup Poland vs Columbia