esakal | विजेतेपदासाठी बार्सिलोना, माद्रिदमध्ये चुरस
sakal

बोलून बातमी शोधा

बार्सिलोना - स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत सेव्हिला विरुद्धच्या सामन्यात बार्सिलोनाच्या विजयाची शिल्पकार जोडी डावीकडून लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेझ.

विजेतेपदासाठी बार्सिलोना, माद्रिदमध्ये चुरस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बार्सिलोना - स्पॅनिश लीग स्पर्धेत बार्सिलोना आणि रेआल माद्रिद यांनी आपापले सामने जिंकल्यामुळे दोन्ही संघांत असलेली विजेतेपदाची स्पर्धा कायम राहिली आहे. रेआल माद्रिद बार्सिलोनापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे.

लिओनेल मेस्सी आणि लुईस सुवारेझ फॉर्मात असलेल्या बार्सिलोनाने सेव्हिलाविरुद्धच्या सामन्यात 10 व्या मिनिटापासून वर्चस्व मिळवले. हा सामना त्यांनी 3-0 असा जिंकला. यातील दोन गोल मेस्सीने केले, तर सुवारेझने बायसिकल किकवर गोल केला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोशिवाय खेळणाऱ्या रेआल माद्रिदने लेगानेसचा 4-2 असा पराभव केला.

बार्सिलोना आणि सेव्हिलाविरुद्धच्या सामन्यात सातत्याने पाऊस पडत होता. पण बार्सिलोनाच्या खेळाडूंनी खेळावरची पकड ढिली होऊ दिली नाही. पहिला अर्धातील खेळ अफलातून होता. सेव्हिलाकडून आम्हाला फारसा प्रतिकार झाला नाही. अखेरच्या काही मिनिटांत आमची पकड थोडीशी ढिली झाली, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. एकूणच संघाच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे मत बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी व्यक्त केले.

मेस्सीच्या पासवर सुवारेझने बायसिकल किक मारून 25 व्या मिनिटाला सामन्यातला पहिला गोल केला. सुवारेझने गेल्या सात सामन्यांत सात गोल केले आहेत. त्यानंतर मेस्सीने 28 आणि 33 व्या मिनिटाला गोल केले.

ख्रिस्तियानो रोनाल्डोसह गॅराथ बे, टोनी क्रुझ आणि करिम बेन्झेमा या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळताना रेयाल माद्रिदने आपली विजयी मालिका कायम ठेवली.

चेल्सी विजेतेपदाच्या दिशेने
एडन हॅझार्डने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर चेल्सीने मॅंचेस्टर सिटीचा 2-1 असा पराभव केला आणि इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाची दावेदारी अधिक बळकट केली. चेल्सीचे 30 सामन्यांतून सर्वाधिक 72 गुण झाले आहेत. त्यांच्याबरोबर विजेतेपदासाठी शर्यत करणाऱ्या टॉटनहॅम हॉटस्पोरचे 30 सामन्यांतून 65 गुण झाले आहेत. हॉटस्पोरने पिछाडीवरून स्वानसीवर 3-1अस विजय मिळवला. चेल्सीचा हा विजय सोपा करणाऱ्या हॅझार्डने 10 व्या आणि 35 व्या मिनिटाला गोल केले, तर मॅंचेस्टर सिटीकडून सर्गी अग्युरोने 26 व्या मिनिटाला चेंडू गोलजाळ्यात मारला. सामन्यातले हे तिन्ही गोल पूर्वार्धात करण्यात आले.

loading image