अर्जेंटिनाचा पराभव करून फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत; मेस्सी निष्प्रभ

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

सनसनाटी सुरुवात 
सामन्याची सुरुवातच मुळाच सनसनाटी होती. अर्जेंटिनाच्या मार्कस रोहोने एम्बापेला गोलक्षेत्रात अवैधपणे खाली पाडले आणि फ्रान्सला पेनल्टी मिळाली यावर ग्रिझमनने गोल केला. त्यानंतर शिडामध्ये हवा शिरलेल्या फ्रान्सच्या खेळाडूंचा वेग कमालीचा वाढला. त्यामध्ये अर्जेंटिनाची नाव डुबणार असे वाटत असताना डीमारियाने बरोबरीचा गोल केला. 

कझान : तळ्यात मळ्यात हेलकावे खात आव्हान कसेबसे जिवंत ठेवलेल्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या विश्‍वकरंडक फुटबॉल मोहिमेस अखेर पूर्णविराम मिळाला. ताकदवर आणि कसलेल्या फ्रान्सने फारच वेगवान खेळ करत बाद फेरीचा हा सामना 4-3 असा जिंकला. 

रशियातील यास्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात पहिल्याच सात गोलांचा धडाका सादर झाला. तीन गोल अर्जेंटिनाने केले खरे, परंतु सामन्यात फ्रान्सचा प्रभाव होता. मेस्सीची जादू चालली नाही. फ्रान्सच्या बचावपटूंनी ती चालूही दिली नाही. अर्जेंटिनाकडून करण्यात आलेल्या दोन गोलांमध्ये मेस्सीचा वाटा होता, परंतु फ्रान्स खेळाडूंनी धोकादायक क्षेत्रात मेस्सीच्या पायापाशी चेंडू फार वेळा जाणार नाही याची काळजी घेतली. 

फ्रान्सच्या वेगवान खेळासमोर अर्जेंटिनाने हार मानली नव्हती. तोडीस तोड खेळ केला, परंतु बचावातील चुका पुन्हा एकदा त्यांच्या मुळावर आल्या. पूर्वार्धात 1-1 अशा बरोबरीत असलेल्या या सामन्यात उत्तार्धात मात्र गोलांचा धडाका होता. पहिला गोल फ्रान्सने पेनल्टी कीकवर, तर सामन्यातील अखेरचा गोल भरपाई वेळेत अर्जेंटिनाकडून झाला. या लढतीत एवढी चुरस होती. त्यानंतर उरलेल्या काही क्षणांत बरोबरीचा गोल करण्यासाठी अर्जेंटिना खेळाडू उताविळ झाले. त्यातच एका फाऊलमुळे फ्रान्स खेळाडूंबरोबर झालेली चकमक त्यामुळे वेळ निघून गेला आणि अखेर पराभवाची वेळ त्यांच्यावर आली. 

फ्रान्सचे प्रशिक्षक डेश्‍चाम्प यांनी ताकदवर संघ उतरवला आणि पहिला गोल करणाऱ्या हुकमी ग्रिझमनला त्यांनी अखेरच्या क्षणी राखीव खेळाडू केले इतके त्यांचे नियोजन पक्के होते. संघात परतणाऱ्या एम्बापेने चारपैकी दोन गोल करून आपली उपयुक्तता दाखवली. 

सनसनाटी सुरुवात 
सामन्याची सुरुवातच मुळाच सनसनाटी होती. अर्जेंटिनाच्या मार्कस रोहोने एम्बापेला गोलक्षेत्रात अवैधपणे खाली पाडले आणि फ्रान्सला पेनल्टी मिळाली यावर ग्रिझमनने गोल केला. त्यानंतर शिडामध्ये हवा शिरलेल्या फ्रान्सच्या खेळाडूंचा वेग कमालीचा वाढला. त्यामध्ये अर्जेंटिनाची नाव डुबणार असे वाटत असताना डीमारियाने बरोबरीचा गोल केला. 

मध्यांतराच्या बरोबरीनंतर मेस्सीच्या पासवर मेर्काडोने गोल केला. अर्जेंटिनाला आघाडी मिळाली आणि त्यांना भलताच जोर चढला. परंतु बचावातील चुकांमुळे त्यांचे विमान जमिनीवर आले. पावर्दने फ्रान्सला बरोबरीचा गोल करून दिल्यानंतर एम्बापेने दोन गोल करत अर्जेंटिनाच्या जखमेवर मीठ चोळले.

Web Title: France Knocks Lionel Messi and Argentina Out of Football World Cup