भारताचा कंबोडियावर निसटता विजय

पीटीआय
Thursday, 23 March 2017

न्हॉम पेन्ह (कंबोडिया) -भारताने मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात कंबोडियावर ३-२ अशी मात केली. दुसऱ्या सत्रातील धडाक्‍याच्या जोरावर भारताने निसटता विजय मिळविला.

न्हॉम पेन्ह (कंबोडिया) -भारताने मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात कंबोडियावर ३-२ अशी मात केली. दुसऱ्या सत्रातील धडाक्‍याच्या जोरावर भारताने निसटता विजय मिळविला.

ऑलिंपिक स्टेडियमवरील कृत्रिम हिरवळीवर हा सामना झाला. सुनील छेत्रीने ३६व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले, पण पुढच्याच मिनिटाला कोहून लॅबोरावी याने कंबोडियाला बरोबरी साधून दिली. ही बरोबरी मध्यंतरापर्यंत कायम राहिली. त्यानंतर उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या जेजे लालपेखलुआ आणि संदेश झिंगन यांनी प्रभाव पाडला. या दोघांनी चार मिनिटांच्या अंतराने गोल केले. जेजे याने ५०व्या मिनिटाला लक्ष्य साधले, तर संदेश झिंगन याने ५४व्या मिनिटाला हा गोल केला. जॅकीचंद सिंग याने जेजे याला पास दिला. त्यामुळे जेजे गेल्या आठ सामन्यांत भारतासाठी आठवा गोल करू शकला. त्याआधी युजीन्सन लिंगडोह याने कॉर्नरवर दिलेल्या चेंडूला बचाव फळीतील झिंगनने अचूक हेडिंग केले.

कंबोडियाकडून ६२व्या मिनिटाला चॅन वथानाका याने दुसरा गोल केला. त्याने गुरप्रीतसिंग संधू याला चकविले. त्यानंतर मात्र भारताने बचाव अभेद्य राखला.

दृष्टिक्षेपात
 भारताला परदेशातील मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात १२ वर्षांच्या खंडानंतर प्रथमच विजय
 यापूर्वी २००५ मध्ये पाकिस्तानवर मात
 भारताकडून अनास एडाथोडीका आणि मिलन सिंग यांचे 
    आंतरराष्ट्रीय पदार्पण, अनास ५१२वा, तर मिलन ५१३वा खेळाडू
 भारताची यानंतर आशियाई करंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत २८ मार्च रोजी म्यानमारविरुद्ध लढत
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामना खेळताना भारतीय संघाने वेगवान प्रारंभ करण्याची गरज आहे.आपल्या खेळाडूंनी एकमेकांच्या साथीत खेळायला शिकावे. परदेशात सामना जिंकला असला तरी फार हुरळून जाण्याची गरज नाही.
- स्टीफन कॉन्स्टंटाईन, भारताचे प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's victory over Cambodia