"वार'ग्रस्त सामन्यात इराणने रोखूनही पोर्तुगाल बाद फेरीत 

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

इराण आणि पोर्तुगाल यांच्यातील सामना बहुचर्चित वार पद्धतीमुळे गाजला. पेनल्टी दवडलेल्या, पण लाल कार्डपासून बचावलेल्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या संघाला हरविण्याची आणि गटातील अव्वल स्थानासह आगेकूच करण्याची सुवर्णसंधी इराणने दवडली. दुसरीकडे स्पर्धेतील दुसऱ्या बरोबरीमुळे पोर्तुगालला रशियाच्या तुलनेत सरस असलेल्या उरुग्वेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. 

सारांन्स्क - इराण आणि पोर्तुगाल यांच्यातील सामना बहुचर्चित वार पद्धतीमुळे गाजला. पेनल्टी दवडलेल्या, पण लाल कार्डपासून बचावलेल्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या संघाला हरविण्याची आणि गटातील अव्वल स्थानासह आगेकूच करण्याची सुवर्णसंधी इराणने दवडली. दुसरीकडे स्पर्धेतील दुसऱ्या बरोबरीमुळे पोर्तुगालला रशियाच्या तुलनेत सरस असलेल्या उरुग्वेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. 

पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला रिकार्डो करीस्माने सनसनाटी गोल केला. त्यामुळे मध्यंतरास पोर्तुगाल आघाडीवर होता. भरपाई वेळेत व्हीएआर पद्धतीमुळे इराणला पेनल्टी मिळाली. ती बदली खेळाडू करीम अन्सारीफर्द याने सत्कारणी लावली. त्याने नेटच्या वरील भागात अचूक फटका मारला. भरपाई वेळेतच इराणला संधी होती; पण मेहदी तारेमी याने ती दवडली. त्याने मारलेला चेंडू नेटच्या बाहेरील भागाला लागला. 

52व्या मिनिटाला एझातोलाहीने रोनाल्डोला फाऊल केले. हे पंच एन्रीके कॅसेरेस यांच्या नजरेतून सुटले; पण वारमुळे पंचांचा निर्णय रद्द करण्यात आला आणि पोर्तुगालला पेनल्टी देण्यात आली. ती घेण्यासाठी रोनाल्डोच पुढे सरसावला, पण त्याला उजव्या कोपऱ्यात नीट फटका मारता आला नाही. परिणामी, प्रतिस्पर्धी गोलरक्षक बैरानवांद चेंडू आरामात अडवू शकला. हाच रोनाल्डो व्हीएआर पद्धतीमुळे बचावला. त्याने मोर्तझा पौरालिगाजीच्या चेहऱ्यापाशी दंडाने ढुशी दिली. हा प्रसंगसुद्धा व्हीडीओ मॉनीटरकडे सोपविण्यात आला. त्यात रोनाल्डोचे पिवळ्या कार्डवर निभावले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran beat Portugal in World Cup