क्रोएशियाकडून यजमान रशिया शूट'आऊट' (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Sunday, 8 July 2018

पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाच्या स्मोलोव याने पहिली पेनल्टी वाया घालविली. त्यानंतर क्रोएशियाच्या कोवेसिच याचीही पेनल्टी रशियाच्या गोलरक्षकाने अडविली. त्यामुळे येथेही बरोबरी झाली. त्यानंतर मात्र, रशियासाठी दुसरा गोल करून हिरो झालेला मारिओ फर्नांडिसच खलनायक ठरला. त्याने मारलेली पेनल्टी बाहेर गेली. तर दुसरीकडे क्रोएशियाच्या खेळाडूंनी एकही पेनल्टी न दवडता गोल करत संघाला 4-3 असा विजय मिळवून दिला. 

क्रोएशियाने यजमान रशियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत क्रोएशियाची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. 

उपउपांत्य फेरीचा हा सामना क्रोएशियासाठी सोपा असल्याचे मानले जात होते. मात्र, रशियाने तोडसतोड खेळ करत क्रोएशियाला जबरदस्त टक्कर दिली. 31 व्या मिनिटाला रशियाच्या चेरिशेव याने डीच्या बाहेरून उत्कृष्ट शॉट मारून गोल केला. त्यानंतर आठ मिनिटातच क्रोएशियाच्या क्रॅमॅरिक याने गोल करून क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. यामुळे पहिला हाफ 1-1 असा बरोबरीत सुटला. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, दोन्ही संघांच्या बचावफळीने चांगला खेळ करत प्रतिस्पर्धी संघांना गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे सामन्याच्या निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी राहिली.

त्यानंतर अतिरिक्त वेळेत 101 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या बचाव फळीत खेळणाऱ्या व्हिडा याने हेडरद्वारे गोल करत क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली. सामना क्रोएशियाच्या हातात असताना 115 व्या मिनिटाला रशियाच्या मारियो फर्नांडिसने याने ऍलेन झेगोफच्या फ्रिकीकवर हेडरद्वारे गोल करत रशियाला बरोबरी साधून दिली. या गोलमुळे रशियाच्या प्रेक्षकांकडून स्टेडियममध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागणार हे निश्चित झाले.

पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाच्या स्मोलोव याने पहिली पेनल्टी वाया घालविली. त्यानंतर क्रोएशियाच्या कोवेसिच याचीही पेनल्टी रशियाच्या गोलरक्षकाने अडविली. त्यामुळे येथेही बरोबरी झाली. त्यानंतर मात्र, रशियासाठी दुसरा गोल करून हिरो झालेला मारिओ फर्नांडिसच खलनायक ठरला. त्याने मारलेली पेनल्टी बाहेर गेली. तर दुसरीकडे क्रोएशियाच्या खेळाडूंनी एकही पेनल्टी न दवडता गोल करत संघाला 4-3 असा विजय मिळवून दिला. 

विश्वकरंडकात क्रोएशिया हा दुसरा संघ ठरला आहे, ज्याने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. यापूर्वी 1990 मध्ये अर्जेंटिनाने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये सलग दोन विजय मिळविले होते. गेल्या पाच विश्वकरंडकामध्ये यजमान देशाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेली होती. मात्र, यंदाच्या विश्वकरंडकात यजमान रशिया उपांत्य फेरी गाठू शकला नाही. शनिवारी अन्य उपउपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा 2-0 ने पराभव केला. त्यामुळे इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. इंग्लंडच्या इतिहासात फक्त तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठू शकला आहे. यापूर्वी ते 1966 आणि 1990 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोचले होते. आता उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना क्रोएशियाबरोबर होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Croatia vs Russia match