नाट्यमय बरोबरीने स्पेन, पोर्तुगाल बाद फेरीत (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Tuesday, 26 June 2018

ब गटातील हे दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने या गटातून स्पेन आणि पोर्तुगाल पुढील फेरीसाठी पात्र ठरले. या गटात स्पेन 5 गुणांसह पहिल्या स्थानावर, तर, पोर्तुगालही पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि इराण 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. स्पेनने साखळी फेरीत जास्त गोल केल्यामुळे त्यांना पहिले स्थान मिळाले. स्पेनने सहा गोल केले आहेत, तर पोर्तुगालने पाच गोल आहेत. दुसरीकडे अ गटात उरुग्वे पहिल्या आणि रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता बाद फेरीत अंतिम सोळा संघांच्या लढतीत स्पेनची लढत यजमान रशियासोबत, तर पोर्तुगालची लढत उरुग्वे संघासोबत होणार आहे.

विश्वकरंडकात ब गटातील कोणते दोन संघ बाद फेरीत जाणार हे अखेरच्या मिनिटाला निश्चित झाले अन् स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र झाले. निर्णायक दोन्ही सामन्यांमध्ये भरपाई वेळेत नाट्यमयरित्या गोल होऊन बरोबरी झाली आणि या गटात स्पेन पहिल्या आणि पोर्तुगाल दुसऱ्या स्थानावर राहिले. सोमवारी रात्री एकाचवेळी हे दोन्ही सामने खेळविण्यात आले. 

स्पेन आणि मोरोक्को यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. सामन्याच्या 14 व्या मिनिटाला स्पेनचा कर्णधार रामॉस व इनेस्टा यांच्यात समन्वयाच्या अभावामुळे मोरोक्कोला पहिला गोल करता आला. मोरोक्कोच्या बऊपायब याने गोल करत मोरोक्कोला आघाडी मिळवून दिली. स्पेनने ही पिछाडी लगेच भरून काढली. 19 व्या मिनिटाला स्पेनच्या इनेस्टा आणि इस्को यांनी अप्रतिम खेळ करत गोल केला. मोरोक्को आपण स्पर्धेबाहेर गेल्याचे माहिती असूनही त्यांच्याकडून जोरदार खेळ करण्यात येत होता. मोरोक्कोने 81 व्या मिनिटाला कॉर्नरवरून इन नेसरी याने हेडरद्वारे गोल करत मोरोक्कोला आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर असताना स्पेनने आपले स्पर्धेतील भविष्य काय याची माहिती नसताना जोरदार खेळ कायम ठेवला. अखेर भरपाई वेळेत स्पेनच्या 90 (+1) इगो आसपास याने गोल करत स्पेनला बरोबरी साधून दिली. रेफ्रींनी हा गोल ऑफसाईट दिली होती. मात्र, व्हिएआरचा वापर करून हा गोल वैध ठरविण्यात आला. त्यामुळे हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.

या गटातील दुसरा सामना पोर्तुगाल आणि इराण यांच्यात झाला. पुढील फेरीसाठी पात्र होण्यासाठी इराणला विजय आवश्यक होता. सामन्याच्या सुरवातीपासून इराणच्या खेळाडूंचे वर्चस्व होते. पण, पहिल्या हाफच्या अखेरीस 45 व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिकार्डो करिझ्मा याने गोल करत इराणला धक्का दिला. पोर्तुगालने 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये 53 व्या मिनिटाला रोनाल्डोला डी मध्ये पाडल्याने पेनल्टी मिळाली. रोनाल्डोने स्वतः ही पेनल्टी घेतली, पण त्याला गोल करण्यात अपयश आले. पोर्तुगाल 1-0  असे अखेरपर्यंत आघाडीवर असताना भरपाई वेळेत 90 (+3) मिनिटाला पोर्तुगालच्या खेळाडूच्या हाताला चेंडू लागल्याचे व्हिएआरमध्ये स्पष्ट झाले आणि इराणला पेनल्टी मिळाली. इराणचा कर्णधार अन्सरीफर्द याने गोल करत बरोबरी साधून दिली. 

ब गटातील हे दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने या गटातून स्पेन आणि पोर्तुगाल पुढील फेरीसाठी पात्र ठरले. या गटात स्पेन 5 गुणांसह पहिल्या स्थानावर, तर, पोर्तुगालही पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि इराण 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. स्पेनने साखळी फेरीत जास्त गोल केल्यामुळे त्यांना पहिले स्थान मिळाले. स्पेनने सहा गोल केले आहेत, तर पोर्तुगालने पाच गोल आहेत. दुसरीकडे अ गटात उरुग्वे पहिल्या आणि रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता बाद फेरीत अंतिम सोळा संघांच्या लढतीत स्पेनची लढत यजमान रशियासोबत, तर पोर्तुगालची लढत उरुग्वे संघासोबत होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Spain Portugal qualify to Round 16