अर्जेंटिनाच्या संधीबाबत मॅराडोना यांचा आशावाद 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

राष्ट्रीय संघाविषयी जितका वाटायला हवा तेवढा आदर मला वाटतो. असे असले तरी मेस्सीच्या गैरहजेरीत विश्वकरंडक पात्रता धोक्‍यात आली आहे. 
- दिएगो मॅराडोना

ब्युनॉस आयर्स - अर्जेंटिनाच्या संघाकडे अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमता नेहमीच राहिली आहे. आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्रता धोक्‍यात आली असली तरी प्ले-ऑफ लढतीद्वारे मोहीम तडीस जाईल असा आशावाद महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनी जागविला आहे. 

हुकमी स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याच्यावर चार सामन्यांची बंदी आल्यामुळे अर्जेंटिनाच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला. मागील महिन्यातील पात्रता सामन्यात सहायक पंचांना शिवीगाळ केल्यामुळे मेस्सीवर ही कारवाई झाली आहे. 

तुलना नको 
मेस्सी आणि आपली तुलना केली जाऊ नये, असे साकडे मॅराडोना यांनी पुन्हा एकदा घातले. 1986 मध्ये मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला जगज्जेतेपद एकहाती जिंकून दिले. मेस्सीला अद्याप ही कामगिरी करता आलेली नाही. 56 वर्षांचे मॅराडोना म्हणाले की, मी कारकिर्दीची सांगता केली आहे. मैदानावरील खेळाचा आनंद मी पुरेपूर लुटला. आता मेस्सीची कारकीर्द सुरू आहे. आम्हा दोघांमध्ये कोणतीही तुलना करणे योग्य नाही. 

राष्ट्रीय संघाविषयी जितका वाटायला हवा तेवढा आदर मला वाटतो. असे असले तरी मेस्सीच्या गैरहजेरीत विश्वकरंडक पात्रता धोक्‍यात आली आहे. 
- दिएगो मॅराडोना 

दृष्टिक्षेपात 
- दक्षिण अमेरिका विभागात अर्जेंटिना सध्या पाचव्या स्थानावर 
- पहिले चार संघ थेट पात्र ठरणार 
- पाचव्या क्रमांकावरील संघाला प्ले-ऑफ खेळण्याची संधी 
- अर्जेंटिनाचे चार सामने बाकी 
- मेस्सीवरील बंदीच्या कालावधीत उरुग्वे, व्हेनेझुएला आणि पेरू यांच्याविरुद्ध खेळण्याचे आव्हान 
- ईक्वेडोरविरुद्ध दहा ऑक्‍टोबरला होणाऱ्या अखेरच्या सामन्यासाठी मेस्सी उपलब्ध 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maradona: Argentina Are Screwed Without Messi!