esakal | पोर्तुगालने वर्ल्डकपसाठी चार फुटबाॅलपटूंना वगळले
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्तुगालने वर्ल्डकपसाठी चार फुटबाॅलपटूंना वगळले

पोर्तुगालने वर्ल्डकपसाठी चार फुटबाॅलपटूंना वगळले

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लिसबन : युरो विजेतेपद मिळविलेल्या संघातील चौघांना वगळून पोर्तुगालने येत्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. त्यामुळे पुन्हा एकदा ख्रिस्तियानो रोनाल्डो त्यांचा एकांडा शिलेदार ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातच गटात त्यांना स्पेनचे तगडे आव्हान असणार आहे. 

दोन वर्षांपूर्वीच्या युरो करंडक विजेत्या संघात समावेश असलेल्या काही खेळाडूंना संघातून वगळणे कठीण आहे; परंतु त्याशिवाय पर्याय नव्हता, असे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंतोस यांनी सांगितले. वगळलेल्या या चार प्रमुख खेळाडूंमध्ये लाझिओ संघाचा नानी, बार्सिलोनातून खेळणारा आंद्रे गोमेस, बायर्न म्युनिकचा रेनाटो सॅंचेझ आणि युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध जादा डावात गोल करणारा स्ट्रायकर एडगर यांचा समावेश आहे.

त्या अंतिम सामन्यात रोनाल्डो जखमी झाल्यामुळे काही वेळानंतर खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी पोर्तुगालची मदार सांभाळली होती. 

युरो स्पर्धेत विजेतेपदाच्या प्रवासात असलेल्या काही खेळाडूंना वगळणे हे दुःखद आहे. पोर्तुगालचा फुटबॉल इतिहास लिहिताना त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे; पण पुढील आव्हानांसाठी सर्वोत्तम संघ तयार करण्यासाठी मला काही इतर पर्याय पसंत करावे लागले, असे सॅंतोस यांनी सांगितले. 

मॅंचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू असलेला नानी हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुईस फिगो यांच्यानंतर पोर्तुगालचा सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू आहे. गतवर्षीच्या कॉन्फडरेशन करंडक स्पर्धेनंतर तो पोर्तुगालकडून खेळलेला नाही.

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या 23 खेळाडूंच्या संघात इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळलेल्या चार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये विजेत्या मॅंचेस्टर सिटीच्या बर्नांडो सिल्वाचा समावेश आहे.