अर्जेंटिना-इंग्लंड "फायनल'चे डेव्हिड बेकहॅमचे भाकित 

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

लिओनेल मेस्सीला अजून सूर सापडायचा आहे आणि त्याच्या संघाला सलामीला बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होईल, असे भाकित इंग्लंडचा माजी विख्यात फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने व्यक्त केले आहे. 

लंडन - लिओनेल मेस्सीला अजून सूर सापडायचा आहे आणि त्याच्या संघाला सलामीला बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होईल, असे भाकित इंग्लंडचा माजी विख्यात फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने व्यक्त केले आहे. 

इंग्लंड संघाने सलामीला ट्युनिशियाविरुद्ध 2-1 असा एका गोलाने विजय मिळवल्यानंतर बेकहॅम आपल्या संघाबाबत आशावादी आहे. प्रीमियर लीगसारखी सर्वात मोठी लीग स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असली तरी इंग्लंड फुटबॉलला या लीगचा फायदा झालेला नाही. बेकहॅम कर्णधार असताना इंग्लंडने 2006 मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी खालावलेलीच आहे. 

इंग्लंडने विश्‍वकरंडक जिंकावा याला अर्थातच माझी पसंती असेल. आपला संघ असल्यामुळे माझे झुकते माप असू शकते, पण अंतिम सामन्यापर्यंत जाण्याचा मार्ग सोपा नसेल अशीही भीती त्याने व्यक्त केली. गटातील पहिला सामना आम्ही जिंकलो याचा आनंद आहे. फार मोठा अनुभव नसला तरी आमचा संघ हरहुन्नरी नवोदिकांचा आहे. स्पर्धेत पुढे जात असताना अधिक ताकदवर संघांचा सामना करावा लागणार आहे, त्यामुळे वाट बिकट असेल. असे बेकहॅम म्हणतो. 

गतविजेत्या जर्मनीसारखा संघ अडखळत असल्यामुळे सर्वांना संधी असल्याचे बेकहॅमचा अंदाज आहे. स्पर्धेच्या गटवारीनुसार अर्जेंटिना आणि इंग्लंड यांनी जर अपेक्षित आगेकूच केली, तर त्यांची लढत उपांत्य किंवा अंतिम सामन्यात होऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prediction of David Beckham Argentina-England is in Final