esakal | रेयाल माद्रिद अखेर विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

Champion-League-Football Competition

रेयाल माद्रिद अखेर विजयी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माद्रिद - मातब्बर रेयाल माद्रिदने ‘ग’ गटात व्हिक्‍टोरिया प्लीझेनवर २-१ असा विजय मिळविला. विविध स्पर्धांतील पाच सामन्यांत चार पराभव झाल्यानंतर अखेर त्यांना फॉर्म गवसला; पण प्रशिक्षक जुलेन लोपेतेगुई यांच्यासाठी समस्या कायम आहेत. करीम बेंझेमा याने ११व्या मिनिटाला, तर मार्सेलोने ५५व्या मिनिटाला गोल केले. व्हिक्‍टोरियाचा एकमेव गोल पॅट्रिक हिर्सोस्की याने ७८व्या मिनिटाला केला. या लढतीनंतर लोपेतेगुई यांना विचारण्यात आले की, ‘वीकेंड’ला होणाऱ्या एल क्‍लासिको लढतीच्या वेळी प्रशिक्षकपदाची सूत्रे तुमच्याकडे असतील का?’ त्याविषयी लोपेतेगुई यांनी मुत्सद्दीपणे इतकेच सांगितले की, ‘हा प्रश्‍न माझ्यासाठी नाही. आम्ही रविवारच्या सामन्याच्या तयारीचा विचार करीत आहोत. हा सामना महत्त्वाचा आहे. आम्ही मोठ्या महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरू.’
चेक प्रजासत्ताकच्या व्हिक्‍टोरिया संघाने चांगली लढत दिली. मिलान पेत्रझेला याचा फटका केलॉर नवास याच्या मांडीवर लागल्यामुळे ब्लॉक झाला. याशिवाय त्याने जवळून मारलेला फटका नेटवरून गेला. डेव्हिड लिंबर्स्की याचा प्रयत्नही स्वैर होता.

दृष्टिक्षेपात
    चॅंपियन्स लीगमध्ये घरच्या मैदानावर रेयाल माद्रिदने गेल्या ४४ सामन्यांत प्रत्येक वेळी किमान एक गोल केला आहे.
    यापूर्वीचा पराभव एप्रिल २०११ मध्ये बार्सिलोनाविरुद्ध (०-२)
    तेव्हापासून सॅंतीयागो बेर्नाबेयू स्टेडियमवर १२७ गोल
    गटामध्ये घरच्या मैदानावर २७ सामन्यांत अपराजित मालिका. यापूर्वीचा पराभव ऑक्‍टोबर २००९ मध्ये एसी मिलानविरुद्ध (२-३)
    करीम बेंझेमाचा या स्पर्धेतील ५७वा गोल

loading image